Shyam Rangeela News वाराणसी : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात कॉमेडियन श्याम रंगीला उतरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात श्याम रंगीला लोकसभा निवडणूक लढवत आहे. श्याम रंगीलानं काल त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातून त्याच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. श्याम रंगीलाकडे एक मारुती सुझुकी कार आहे. याशिवाय त्याच्याकडे 35 हजार रुपये रोख रक्कम आहे. श्याम रंगीलाच्या बँक खात्यामध्ये 1 लाख 23 हजार रुपये आहेत. याशिवाय त्यानं विमा पॉलिसीत रक्कम गुंतवली आहे. श्याम रंगीलाकडे एक वॅगनर देखील आहे. श्याम रंगीलाकडे एकूण 12 लाख 54 हजार 751 रुपयांची जंगम संपत्ती आहे.
श्याम रंगीलावर कर्ज किती? (Shyam Rangeela Loan Amount)
श्याम रंगीला जवळ 4 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्याच्यावर 7 लाख 66 हजार 293 रुपयांचं कर्ज देखील आहे. श्याम रंगीला हा राजस्थानातील असून त्यानं 2012 मध्ये हनुमानगढमधीळ राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय बडोपलमधून बारावीचं शिक्षण घेतलं आहे. श्याम रंगीलनं 2022-23 मध्ये त्याचं उत्पन्न 4 लाख 99 हजार 530 रुपये दाखवलं आहे.
श्याम रंगीलानं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं आणि सदिच्छांमुळं मला ताकद मिळाली. सर्व आणि प्रक्रिया पूर्ण करत अनेक अडथळ्यांनंतर नामांकन दाखल केलं आहे. वाराणसीच्या लोकांसमोर पर्याय बनतोय. अजून दोन तीन दिवस वाट पाहावी लागेल. त्यानंतर चिन्ह मिळेल, पूर्ण ताकदीनं लढू, तुम्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे, असं श्याम रंगीला म्हणाला.
श्याम रंगीलानं आणखी एका पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सहकार्यानं नामांकन दाखल केलं आहे.. सर्व नियमाचं आणि आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली असल्याचं श्याम रंगीला म्हणाला. श्याम रंगीलानं पुढील दोन तीन दिवस महत्त्वाचे असल्याचं म्हटलं. तुमच्या सर्वांचं सहकार्याबद्दल आभार, असं श्याम रंगीला म्हणाला. श्याम रंगीला यानं लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडचणी आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अखेर काल त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून अजय राय निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजय मिळवलेला आहे. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचं आव्हान आहे.
संबंधित बातम्या :
तुमची स्वप्ने, माझा संकल्प; 4 जूननंतरही याच ताकदीने काम करणार, पंतप्रधान मोदींचं जनतेला आश्वासन
Shirur : अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव? शिरूर लोकसभेचा घाट ते दिल्ली ही शर्यत कोण जिंकणार? माझा अंदाज