आमच्याकडे आता सगळं हाऊसफुल्ल झालंय. सर्व चांगले लोक आमच्याकडे आले आहेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे तुमचा विस्तवं पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच दहा निवडून येतील ते तरी आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? याचा विचार करा, असं होणार असेल तर मग कशाला त्यांना मतं द्यायची. ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले.
स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देणार असल्याचे विरोधक सांगत आहेत. मात्र, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. आताही बेकारांना संधी आम्ही देणार याच्यासाठी आम्ही काम करतोय. मात्र, आता शरद पवारांसह विरोधक बेकार झाले आहेत. त्यामुळे त्यांना बेकारी काय असते हे आता कळले आहे, असेही ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले की, नगरमध्ये आता आम्ही पाणी आणणार आहोत. निळवंडे धरण आणि पश्चिमेकडे जाणाऱ्याचा पाण्याचा समावेश आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यासाठी नवीन विकासाची कामे आम्ही हाती घेत आहोत. यामध्ये एमआयडीसी, पाण्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये कसे मिळणार याची योजना मी करुन ठेवलीय. येत्या पाच वर्षात मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन दाखवणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करणार आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.