पालघर : विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर ओक्साबोक्सी रडणारे शिंदे गटाचे मावळते आमदार श्रीनिवास वनगा यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं दिसतंय. श्रीनिवास वनगा हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत दिसून आले असून महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासोबत ते स्टेजवरही दिसले. श्रीनिवासचं चांगले होईल, त्याला इकडे तिकडे पाहायची गरज नाही असा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यानी दिला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करणारे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी एकनाथ शिंदे यांचे पालघरच्या हेलिपॅडवर स्वागत केले. त्यानंतर महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी स्टेजवर श्रीनिवास वनगा उपस्थित होते. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याच्या चर्चा आहे.
इतके तिकडे पाहायची गरज नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी लोकसभेमध्ये काहींना उमेदवारी देऊ शकलो नाही. परंतु त्यांना विधानसभेत ताबडतोब उमेदवारी दिली. आम्ही उठाव केला तेव्हा श्रीनिवास माझ्यासोबत होता. आताही श्रीनिवासच्या घरचा कार्यक्रम होता. तो बाजूला ठेवून याच मार्गाने तो आमच्या सोबत आला.श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहे. श्रीनिवासचं चांगलं होईल, त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज नाही.
श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापलं
एकनाथ शिंदे जून 2022 ला सूरतला जाताना ज्या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण दाखवून पालघरच्या दिशेनं गेले होते त्याच श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. शिंदेंसोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी 39 आमदारांना पु्न्हा संधी देण्यात आली. पण फक्त श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्या ठिकाणी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज होते. त्यांचा ओक्साबोक्सी रडतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा हे चार दिवस गायब झाले होते. ते आत्महत्या करण्याच्या विचारात होते असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं. चार दिवसानंतर वनगा हे घरी परतले.
उद्धव साहेब आमच्यासाठी देव होते. शिदेंसाहेंबावर विश्वास ठेवला ही आमची चूक झाली. 39 आमदारांचं पुनर्वसन केलं, माझ्या पतीचं काय चुकलं असा सवाल श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी विचारला होता.
तिकीट वाटपावेळी झालेल्या नाराजीनाट्यानंतर आता श्रीनिवास वनगा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे.
ही बातमी वाचा :