Shahrukh Khan Baazigar Sequel: बॉलिवूडच्या किंग खाननं त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत आवर्जुन समाविष्ट होणारा चित्रपट म्हणजे, 'बाजीगर'. 1993 मध्ये रिलीज झालेल्या याचित्रपटानं आजही चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. एरव्ही हिरो म्हणून मिरवणारा किंग खान या चित्रपटात मात्र व्हिलनच्या भूमिकेत झळकला होता. याच चित्रपटानं शाहरुख खानला, 'द शाहरुख खान' बनवलं होतं. निगेटिव्ह भूमिका होती, पण जबरदस्त साकारली होती. शाहरुखच्या आधी अनेक स्टार्सना या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण, त्या सर्वांनी ती ऑफर धुडकावली. पण, शाहरुख खाननं आपल्या दमदार अभिनयानं तो निगेटिव्ह रोलही अत्यंत क्लासी पद्धतीनं साकारला आणि रातोरात प्रसिद्ध झाला. आता शाहरुखच्या  या चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी आहे. आता शाहरुखच्या सुपरडुपर हिट 'बाजीगर'चा सीक्वेल येणार असल्याचं बोललं जात आहे. 


'बाजीगर'च्या सिक्वेलबाबत शाहरुख खानसोबत चर्चा सुरू असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अशातच आता निर्माते रतन जैन यांनीही या चर्चांना दुजोरा दिला आहे. मात्र, कोणतीही ठोस योजना किंवा स्क्रिप्ट अद्याप तयार झालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. शाहरुख जेव्हा मुख्य भूमिकेत असेल तेव्हाच या प्रोजेक्टवर काम करणार असल्याचं रतन जैन यांनी स्पष्ट केलं आहे.


अनिल कपूरला आलेली 'या' चित्रपटाची ऑफर 


निर्माते रतन जैन यांनी ETimes ला सांगितलं की, 'बाजीगर 2' बद्दल आम्ही शाहरुखशी बोलतोय, पण फार काही बोलणं झालेलं नाही, पण सीक्वेल नक्कीच बनवला जाईल.' 31 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट शाहरुखच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. सर्वात आधी या चित्रपटासाठी अनिल कपूर यांना ऑफर देण्यात आली होती. पण तो 'रूप की रानी चोरों का राजा'च्या शुटिंगमध्ये व्यस्त होता आणि तारखांच्या कमतरतेमुळे अनिल कपूर यांनी चित्रपटाची ऑफर नाकारली.


सलमान खानलाही दिलेली ऑफर 


अनिल कपूरनंतर सलमान खानला या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आलं होतं, पण सलमान खानचे वडील सलीम खान यांना ही स्क्रिप्ट आवडली नाही. त्यांना क्लायमॅक्समध्ये बदल हवा होता. अशा परिस्थितीत हा चित्रपट अखेर शाहरुख खानपर्यंत पोहोचला. अँटी-हिरोच्या भूमिकेत झळकण्यासाठी शाहरुखला अजिबात हरकत नव्हती. त्यानं ती ऑफर स्विकारली आणि त्याचा तोच निर्णय त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. बाजीगरनंतर शाहरुख खान खूप लोकप्रिय झाला. त्यानंतर शाहरुखनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. नंतर 'डर' सारखे चित्रपटही त्यानं केले. पुढे यश चोप्राच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'नं त्याची रोमँटिक हिरो इमेज तयार केली.


विक्कीच्या भूमिकेत झळकलेला शाहरुख, शिल्पा आणि काजोलसोबत केलेली स्क्रिन शेअर 


'बाजीगर'मध्ये शाहरुख खाननं विक्की मल्होत्राची भूमिका साकारली होती. त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असतो. शाहरुखसोबत चित्रपटात काजोल आणि शिल्पा शेट्टीदेखील होत्या. चित्रपट सुपरडुपर हिट ठरलाच, पण त्यासोबतच या चित्रपटातील 'ये काली काली आंखें', 'बाजीगर ओ बाजीगर' ही गाणीही सुपरहिट ठरली.