निवडणुकीच्या रिंगणात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या नावाचा आधार घेत आहेत. कोल्हे एकीकडे महाराजांचा कळवळा दाखवत असले तरी दुसरीकडे त्यांनी महाराजांच्या पवित्र गडावर अश्लील चाळे केल्याचा आहे, असा आरोप शिवसेना महिला आघाडीने पत्रकार परिषदेत केला आहे. यासाठी 5 फेब्रुवारी 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'मराठी टायगर्स' चित्रपटातील रोमँटिक गीत सादर केलं. या गीताचं चित्रीकरण ऐतिहासिक पन्हाळा गडावर झाल्याचा आणि या चित्रीकरणाला परवानगी घेतली नसल्याचा दावाही महिला आघाडीने केला आहे.
स्वतःला शिवभक्त म्हणवणारे, वागण्यात महाराजांची प्रतिमा दाखवणारे अमोल कोल्हे या थराला कसे काय जाऊ शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच कोल्हेंचं शंभूप्रेम हे व्यावसायिक असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीने केला आहे. जनतेची विशेषत: महिलांची दिशाभूल करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी माफी मागावी अशी मागणी महिला आघाडीने केली आहे.
पण हे चित्रीकरण स्टुडिओत करुन क्रोमा केला असावा का? परवानगी घेतली नव्हती याचा काही पुरावा आहे का? असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले असता महिला आघाडीने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या सभेत अध्यक्ष राज ठाकरेंनी अवलंबलेल्या फंड्याचं या पत्रकार परिषदेत केलं गेलेलं अनुकरण फोल ठरल्याचं दिसून आलं.