बीडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 19 Apr 2019 04:47 PM (IST)
औरंगाबादमधील उद्धव ठाकरेंच्या सभेवेळीच जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेच्या व्यासपीठावर जाणार आहेत. औरंगाबाद येथील शिवसेनेच्या सभेत जयदत्त क्षीरसागर सहभागी होणार आहेत आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आज संध्याकाळी सहा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. या सभेवेळीच जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. एकूणच राष्ट्रवादीविरोधात बंड करुन युतीच्या उमेदवाराला साथ आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट या सर्व जयदत्त क्षीरसागर लवकरच राष्ट्रवादीतून बाहेर पडतील हे जवळपास निश्चित झालं होतं आणि तशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होती.