नागपूर : लोकसभा निवडणुकांना तोंडावर राज्यात आणि देशात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत गडकरींनी शरद पवार, राज ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेलं त्यांचं राजकारणापलीकडचं नातं अशा विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.


...म्हणून शरद पवारांची माढ्यातून माघार


मला ठामपणे सांगता येणार नाही, मात्र निवडणुकीत जिंकण्याची साशंकता असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी, अशी शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यक्त केली आहे.


राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी


राहुल गांधींबद्दल बोलताना ते मोठे नेते आहेत. मात्र पंतप्रधान हा कुणा एक पक्षाचा नसतो, त्यामुळे टीका करताना पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. विचारांची लढाई असली पाहिजे, मात्र टीका करताना पातळी खाली जाणार याची काळजी राहुल गांधींनी घेतली पाहिजे आणि आम्हीही घेऊ, असं गडकरी म्हणाले.


राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती


राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात का बोलत आहेत, याचं मला आश्चर्य वाटत आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत म्हणजेच राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला हे देखील कळत नाही. युती किंवा आघाडी समविचारी पक्षांशी होत असते. मात्र राज ठाकरे आणि राष्ट्रवादीची विचारधारा भिन्न आहे. तसेत राष्ट्रवादीचा मित्रपक्ष काँग्रेस राज ठाकरेंना कधीही उघड पाठिंबा देणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय नेमका का घेतला, हे समजत नसल्याचं गडकरींनी म्हटलं.


नाना पटोले यांना शुभेच्छा


नागपूरमध्ये कुणीही उमेदवार माझ्या विरोधामध्ये असेल तरी मला काहीच अडचण नाही. लोकसभा निवडणुकीत मी विजयी होईल असा मला विश्वास आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना नितीन गडकरींनी शुभेच्छा दिल्या. लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता न करता मी आजवर केलेलं काम घेऊन मी लोकांकडे मत मागणार आहे, असं गडकरींनी सांगितलं.


पक्षाच्या पलिकडे जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला


आजपर्यंत नागपूरचा विकास आणि नागपूरच्या भविष्यासाठी काम केलं. नागपूरच्या जनतेने सेवेची संधी दिली, त्यामुळेच मी केंद्रात मंत्री म्हणून काम करु शकलो. जनतेची कामं करताना पक्षाच्या पलिकडे जाऊन सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं.


राजकारणात काम करताना व्यक्तिगत संबंधांमध्ये मी कधीही पक्ष आड येऊ दिला नाही. मी पक्षाचा मंत्री नाही तसेच सरकार जनतेचं असतं. त्यामुळे जात, धर्म, पंत यापलिकडे जाऊन सर्वांना मदत करण्याची माझी भूमिका होती, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.


VIDEO : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत