मुंबई : राजधानी मुंबईतील केंद्रस्थान असलेल्या लालबाग परिसरातील अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या शिवडीची उमेदवारी अखेर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना जाहीर झाली आहे. मुंबईतील मातोश्री बंगल्यावर शिवडीच्या उमेदवारीसाठी सकाळपासूनच रणकंद सुरू होतो. सुधीर साळवींना (Sudhri salvi) उमेदवारी देण्याची मागणी करत शिवसैनिक व साळवी समर्थकांनी उद्धव ठाकरेंकडे धाव घेतली होती. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अजय चौधरींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, साळवी समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून  काम करणार असं सुधीर साळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. सुधीर साळवी हे लालबागचा राजा ट्रस्टचे मानद सचिव आहेत. त्यामुळे, त्यांची उमेदवारी नाकारल्यानंतर पुन्हा एकदा लालबागचरणी ठेवण्यात आलेली चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे. कारण, गणपती बाप्पांची श्रद्धा व ठाकरेंकडील निष्ठा दोन्हींपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना होती. 


गणेशोत्सवात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचरणी सुधीर साळवींना आमदारकी मिळावी, अशी चिठ्ठी ठेवण्यात आली होती. सोशल मीडियावर ती चिठ्ठी तुफान व्हायरल झाली होती, मात्र, सुधीर साळवींना शिवडीची उमेदवारी नाकारल्याने पुन्हा एकदी ती चिठ्ठी चर्चेत आली आहे. गणेशोत्सवात लालबागचा राजाचा मंडपात विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरु असताना कोणीतरी गणपतीच्या पायावर एक चिठ्ठी आणून ठेवली. ती चिठ्ठी  राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या चिठ्ठीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा आणि उत्सुकता सर्वांनाच लागून होती. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर ज्यांनी ठाकरेंची निष्ठा जपली, त्या अजिय चौधरींना उमेदवारी जाहीर करत उद्धव ठाकरेंनी निष्ठावंताचा सन्मान केला आहे. 


सुधीर साळवी समर्थकांकडूनच राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आली होती. शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायम राखणाऱ्या आमदारांमध्ये अजित चौधरी यांचा समावेश होता. अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्यामुळे लालबाग परिसरात सुधीर साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर, ठाकरे कुटुंबीयही दरवर्षी लालबागचा राजाचे दर्शन घ्यायला जात असते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. 


शिवसेना विधानसभा संघटक


सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे


दरम्यान, संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देत आहोत असे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील बैठकीत म्हटले. त्यानंतर सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला व ते बाहेर पडले.



हेही वाचा


उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला