ठाणे: राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे हे सोमवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या बंगल्यावर गेले होते. यावेळी पोलिसांनी विजय शिवतारे Vijay Shivtare) यांना न ओळखल्यामुळे त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. त्यामुळे विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच संतापले.
प्राथमिक माहितीनुसार, विजय शिवतारे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटमधून आतमध्ये शिरत असताना त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. तुम्ही कोण, थांबा, असे पोलिसांनी म्हटले. त्यामुळे विजय शिवतारे हे चांगलेच वैतागले आणि त्यांनी पोलिसांना सुनावले. आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का तुम्हाला ? बरोबर नाही, असे प्रत्येक वेळेस करतात तुम्ही, किती वर्षे झाले काम करत आहात?, अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदेंच्या बंगल्याच्या गेटमधून आत सोडण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोन दिवस एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. ताप असल्यामुळे ते दरेगावला होते आणि काल दुपारी ते मुंबईत आले मी औरंगाबादला होतो त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आलो. डॉक्टरांकडून त्यांच्या चाचण्या होत आहेत. मी त्यांना न भेटता श्रीकांत शिंदे यांना भेटून निघालो आहे. बैठकीची मला कल्पना नाही, आमच्या कुठल्याही आमदारांची बैठक नव्हती. सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांचे आहेत आणि ते ठरवतील ते शंभर टक्के सर्वांना मान्य आहे. आम्ही कोणी त्या प्रोसेसमध्ये नाही, सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. ते जे निर्णय घेतील तो सगळ्या आमदारांना मान्य असेल, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.
विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. त्यामुळे शिवतारेंनी बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात दंड थोपटले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर विजय शिवतारे यांनी बंडाची तलवार म्यान केली होती.
विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंचा विजय
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी 24,188 इतक्या मताधिक्याने विजय मिळवला होता. पुरंदर विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासमोर काँग्रेसचे संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांचे आव्हान होते. मात्र, विजय शिवतारे यांनी पुरंदरचा आपला गड राखला होता.
देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेत्यांची गर्दी
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी 5 नोव्हेंबरला होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी भाजपचे अनेक नेते दाखल झाले. मंत्रीपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. यामध्ये माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, अतुल सावे, प्रतापराव चिखलीकर ,चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा समावेश आहे.
आणखी वाचा
एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द, शपथविधीपूर्वी बोलावलेली आमदारांची आजची बैठकही स्थगित