मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजपची युती झालेली असताना कणकणली, देवगडमध्ये मात्र युती नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात युती झाली तरी कोकणात शिवसेना राणेंच्या विरोधात लढण्यावर ठाम आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र युती झाली असतानाही नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत लढणार आहेत. कारण सतीश सामंत यांनी शेवटच्या दिवशीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.
सतीश सामंत हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक समजले जात होते. मात्र नाराजीनंतर सामंत यांनी राणेंची साथ सोडली आणि शिवसेनेने सामंतांना उमेदवारी दिली.
नारायण राणे आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र भाजपने नितेश राणे यांना शेवटच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश देत AB फॉर्म दिला आणि त्यांना कणकवलीतून तिकीट दिलं.
शिवसेना युती धर्म पाळेल आणि नितेश राणेंना सहकार्य करेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. मात्र शिवसेनेने राणेंविरोधात युती धर्म पाळला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कोकणातील शिवसेना-राणे संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.