मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचा जाहीरनामा आज (सोमवारी) प्रसिद्ध करण्यात आला. महाआघाडीच्या जाहीरनाम्यात शेती, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा, पर्यावरण, सामाजिक न्याय या मुद्यांवर भर देण्यात आला आहे. महाआघाडीच्या नव्या जाहीरनाम्यात नव्या उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता देण्यासाठी विशेष कायदा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महाआघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण या वेळी उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील पदवीधर बेरोजगारांना किमान 100 दिवसांचा रोजगार, राज्य सरकारच्या विविध खात्यात रिक्त असलेल्या जागांवर 100 दिवसांत भरती करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
महाआघाडीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाची आश्वासने
- नव्या उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा
- शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणार
- शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्व लक्षात घेता शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
- विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रश्न सोडविणे, परीक्षा निकाल वेळापत्रकानुसार पार पडण्याच्या दृष्टीने विद्यार्थी हक्क आयोगाची स्थापना करणार
- तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता
- उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणार
- कामगारांचे किमान वेतन 21 हजार रुपये करणार
- UPSC प्रमाणेच MPSC चे वेळापत्रक निश्चित करणार तसेच या परीक्षेचा निकाल 45 दिवसांत जाहीर करणार
- निमशहरीआणि ग्रामीण भागातील पदवीधर बेरोजगारांना किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार
- राज्य सरकारच्या विविध खात्यात रिक्त असलेल्या जागा 100 दिवसांत भरण्याची प्रक्रिया सुरू करणार
- मनरेगा अंतर्गत किमान 200 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार
- प्रत्येक जिल्ह्यात एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करणार
- राज्यातील प्रत्येक नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत आणणार
- सर्व महानगरपालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंत असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करणार
- नव्या मोटार वाहन कायद्यात आकारण्यात येणार दंड कमी करणार
- महाराष्ट्रातील दहावी पास दहा लाख तरुणींना पहिल्या वर्षात मोफत लॅपटॉप देण्यात येणार
महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध ; शेतकरी आणि तरुणांसाठी आश्वासने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2019 07:14 PM (IST)
विधानसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेस आणि राष्ट्रावादी महाआघाडीचा जाहीरनामा आज (सोमवारी) प्रसिद्ध करण्यात आला. भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता देण्यासाठी विशेष कायदा आणणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -