मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराची लगबग सुरु झाली आहे. पण सध्या निवडणुकीच्या तयारीत शिवसेना-भाजपने आघाडी घेतली आहे. प्रचारसभा, महामेळाव्याची जय्यत तयारी आहे. तर उमेदवारांच्या याद्याही अंतिम टप्प्यात आहेत. प्रचाराच्या वॉर रुम सज्ज झाल्या आहेत. पण, या प्रचाराच्या कामात युतीने आघाडी घेतली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी मात्र पिछाडीवरच आहे.
आघाडीच्या उमेदवार यादीची अजूनही प्रतीक्षा आहे. अंतर्गत नाराजी, बंडाळी यातच काँग्रेसच्या नेत्यांचा वेळ जात आहे. त्यात, युतीने आता महामेळावे, प्रचारसभांच्या तारखा जाहीर केल्याने आघाडीतल्या मित्रपक्षांची अस्वस्थता वाढली आहे. एबीपी माझाशी बोलताना आघाडीच्या मित्रपक्षांनी मनातली खदखद व्यक्त केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाराज
युतीचा निवडणुकीचा संपूर्ण आराखडा तयार होतो, आघाडीत मात्र चर्चाच संपत नाहीत, अशी नाराजी आघाडीचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेना केला आहे. तसंच आघाडीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवरही मित्रपक्षांकडून टीका होत आहे. आघाडीच्या मनात नेमकं आहे तरी काय? सत्तापरिवर्तनाबाबत आघाडीचे नेते खरंच गंभीर आहेत का? असे प्रश्न मित्रपक्षांनी उपस्थित केले आहेत. एकीकडे युतीच्या प्रचारसभांच्या तारखा जाहीर होतात आणि आघाडीचे नेते चर्चेतच वेळ काढतात. असंच सुरु राहिलं तर त्याचे नकारात्मक परिणाम होतील, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली.
अबू आझमींचा इशारा
"दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीचे लोक प्रचारात उतरले सुद्धा. मात्र, आघाडीतील मित्रपक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा रखडल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते कमजोर आहेत. प्रत्येक गोष्टीवर दिल्लीची परवानगी घेण्यासाठी पळावं लागतं," अशी टीका सपाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. "दुर्देवाने काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी गंभीर आहे असं दिसत नाही. केवळ चर्चा आणि चर्चामध्येच वेळ चालला आहे. एक-दोन दिवस वाट पाहू नाहीतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय रद्द करु. समाजवादी पक्ष सहा जागांवर स्वबळावर लढेल," असा इशाराही अबू आझमी यांनी दिला आहे.