मुंबई : काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांची नावं आहेत. लोकसभेच्या रिंगणात पुन्हा उतरण्याची इच्छा नसलेल्या काँग्रेसच्या तीन माजी खासदारांचा या यादीत समावेश झाला आहे. प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे आणि मिलिंद देवरा पराभवाचा वचपा काढण्यासाठी रणांगणात उतरणार आहेत. साहजिकच गांधी कुटुंबाने या तिघांची समजूत काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असणार.


सुशीलकुमार शिंदे

सोलापुरात पराभवाचा धक्का बसलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडेंनी शिंदेंना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर लोकसभेच्या आखाड्यात पुन्हा न उतरण्याचा निर्धार सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला होता. मात्र सोनिया गांधींच्या आर्जवानंतर ते राजकीय पुनरागमन करण्याच्या बेतात आहेत.

2009 च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंनी 99 हजार 632 म्हणजेच जवळपास लाखभर अधिक मतांनी बनसोडेंना पराभूत केलं होतं. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत याच शरद बनसोडेंनी सुशीलकुमारांना दीड लाखांच्या मताधिक्याने हरवलं. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता सुशीलकुमार उत्सुक असतील.

सोलापूरच्या पारंपरिक मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढवणार आहेत. अशातच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आपला बालेकिल्ला म्हणजेच अकोला सोडून सोलापुरातून शड्डू ठोकण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणी वाढल्याचं मानलं जातं.


लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार



प्रिया दत्त

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त आपली प्रतिष्ठा पुन्हा पणाला लावणार आहेत. सुरुवातीला प्रिया दत्त यांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र पक्षातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर प्रिया दत्तही पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार झाल्या आहेत. जेव्हा प्रिया दत्त इच्छुक नव्हत्या, तेव्हा अभिनेत्री नगमा, कृपाशंकर सिंह यांनी या जागेवर दावा सांगितला होता, मात्र प्रिया दत्त या मतदारसंघातील माजी खासदार असल्यामुळे त्यांच्या पारड्यात मत पडलं.

प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1.86 लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आपला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी प्रिया दत्त पुन्हा कंबर कसतील.

मिलिंद देवरा

काँग्रेसने जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतील तिसरं नाव आहे माजी खासदार मिलिंद देवरा यांचं. पक्षांतर्गत कटकटीला कंटाळलेल्या देवरांनीही पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं होतं. मात्र पक्षाच्या आदेशानंतर ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहे.

मिलिंद हे काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे पुत्र. मिलिंद देवरा हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मिलिंद देवरांची समजूत काढण्यात राहुल गांधींची महत्त्वाची भूमिका असणार, हे निश्चित. मिलिंद देवरा 2009 मध्ये दक्षिण मुंबईचे खासदार होते, मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी देवरांना एक लाख 28 हजार 564 मतांनी पराभवाची धूळ चारली. आता आपल्या पराभवाचा सूड ते विजयश्री मिळवून घेण्यास सज्ज आहेत.

नाना पटोले

भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणं साहजिकच होतं. मात्र भंडारा-गोंदिया या आपल्या मतदारसंघाला सोडून ते नागुपरातून निवडणूक लढवणार आहेत. म्हणजेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच ते थेट आव्हान देणार आहेत.

2014 मधील निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर नाना पटोले भंडारा-गोंदियातून निवडून आले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला खडे बोल सुनावत त्यांनी 2017 साली पक्षाला रामराम ठोकला. जानेवारी 2018 मध्ये ते काँग्रेसच्या गोटात सामील झाले. त्या जागेवरुन पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी झाले, आणि भाजपच्या हातून सीट निसटली. दुसरीकडे, आगामी निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना आव्हान देण्याची घोषणा पटोलेंनी केली होती. आता ही संधी पटोलेंना चालून आली आहे.

नामदेव उसेंडी

लोकसभा उमेदवारांच्या यादीतलं पाचवं नाव आहे गडचिरोलीच्या नामदेव उसेंडी यांचं. भाजपच्या अशोक नेतेंनी 2014 च्या निवडणुकीत ही जागा जिंकून उसेंडींना हरवलं होतं. त्यामुळे भाजपच्या हातातून ही जागा खेचून आणण्याचा उसेंडींचा प्रयत्न असेल, यात वाद नाही.