सातारा : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे भाऊ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघेही कधी एकत्र दिसत नाहीत. दोघांमध्ये अनेक राजकीय आणि वैयक्तिक वाद आहेत. दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन्ही राजेंमधले वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांनादेखील यश आले नाही. परंतु आज सातारकरांनी एक अभूतपूर्व युती पाहिली. साताऱ्याच्या दोन्ही राजेंनी आगामी निवडणुकीसाठी (विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूक) मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.


उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांना भाजपकडून सातारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तर उदयनराजे भाजपच्या तिकीटावर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढत आहेत. त्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांनी आज सातारा येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु तत्पूर्वी सातारा शहरात दोन्ही राजेंनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं.

उदयनराजे भोसले स्वतः शिवेंद्रराजेंच्या वाड्यावर त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढली. यावेळी दोन्ही राजेंच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आर.पी.आय. चे नेते अशोक गायकवाड उपस्थित होते.

शक्तीप्रदर्शनाचा व्हिडीओ पाहा



दोन्ही राजेंनी एकत्रितपणे काढलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, दोन्ही राजेंचे समर्थक सहभागी झाले होते. दोन्ही राजे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिवेंद्रराजेंच्या वाड्याबाहेर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना मिठी मारली तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

...म्हणून उदयनराजेंविरोधात नेहमी मिशीवाला उमेदवार निवडणूक लढवतो