मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुती 200 जागांच्या पार जाणार नाही, असं म्हणत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजपला घरचा आहेर दिला आहे. मनोहर जोशी यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यावेळी ते बोलत होते.


मी शिवसेना प्रमुख्यांच्या विरोधात कधीही बोलत नाही. त्यामुळे सांगतो की, यावेळी राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचं पद मिळणार हे निश्चित आहेत. मात्र त्यांना कोणतं पद मिळेल हे योग्यवेळी समजेल.


भविष्यात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील. लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की निवडून आलेला व्यक्ती कोणत्याही पदावर जाऊ शकतो. त्यामुळे मला विश्वास आहे की, आदित्य ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं मनोहर जोशी यांनी म्हटलं.



निवडणुकीतील भविष्य कुणीही अचूक सांगू शकत नाही. महायुती 200 जागांच्या पार जाईल, असं मला वाटत नाही. मी अनेक निवडणुकांत भाग घेतला आहे. मात्र निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल याचं भाकित अचूक सांगता येत नाही. निवडणूक काळातील शरद पवारांच्या सभा आणि दौऱ्यांवर बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. मात्र ते करतात ती प्रत्येक गोष्ट योग्य असते, असं नाही. शरद पवारांच्या सभा, दौऱ्याचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किती फायदा होईल हे आताचा सांगता येणार नाही.