लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात चर्चा गाजली ती विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या तिकीट कापण्याची...  2009 साली सुनील गायकवाड यांनी भाजपकडून पहिल्यांदा निवणूक लढवली होती, तेव्हा अत्यल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी जिल्ह्यावर विलासराव देशमुख यांची एकहाती सत्ता होती. काँग्रेसचे उमेदवार होते जयवंतराव आवळे... बाहेरील उमेदवार आयात करुनही त्यांचा विजय झाला होता तो देशमुखांच्या राजकारणामुळे.

सुनील गायकवाडांबाबत जनभावना असल्याचं पाहून भाजपने 2014 साली पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. तब्बल अडीच लाख मतांच्या विक्रमी मताधिक्याने सुनील गायकवाड त्यावेळी विजयी झाले. 2014 सालच्या लोकसभेपासून जिल्ह्यात भाजपची विजयी घोडदौड सुरु झाली. जिल्ह्यातील निलंगा विधानसभेतून संभाजी पाटील निलंगेकर आणि उदगीर येथून सुधाकर भालेराव विजयी झाले. त्यानंतर जिल्ह्याचे नेतृत्व संभाजी पाटील यांच्याकडे आले.

नगरपंचायत निवडणूक, नगरपालिका निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक आणि महानगरपालिका निवडणुकीत सलग विजय मिळवत भाजपने जिल्ह्यात एकहाती सत्ता निर्माण केली. मात्र हे होत असताना जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढली.

त्यात गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक ही मुंडेंच्या अकाली निधनाने काहीसे बॅकफूटवर गेले होते. संभाजी पाटील निलंगेकर यांचा गट प्रबळ होत गेला. अशातच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा एक गट सक्रिय झाला. या कोणत्याच गटात न जाणारे खासदार सुनील गायकवाड यांच्या निष्क्रियतेचा फायदा प्रत्येक गटाने उचलला.

जिल्ह्यात गेल्या चार वर्षात दुष्काळ असताना रेल्वेने आलेले पाणी असेल किंवा बोगी प्रकल्प असेल याचे श्रेय खासदारांना देण्यातच आले नाही. लातूर-मुंबई ही रेल्वे बिदरपर्यंत गेली याचे खापर मात्र त्यांच्या माथी फोडण्यात आले. लातूर जिल्ह्यातील भाजपच्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमात खासदारांना नियोजनबद्धरित्या डावलण्यात येत होते. हे होत असताना खासदारांनी त्यावर कोणतीही उपाययोजना केली नाही.

VIDEO | लातूरमधील तिकीट कापल्यानंतर भाजपचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांची प्रतिक्रिया | लातूर | एबीपी माझा



संसदेतील 96 टक्के उपस्थिती आणि आलेला सर्व निधी खर्च केल्यामुळे आपली बाजू भक्कम असल्याच्या भ्रमात राहणे गायकवाडांना महागात पडले. त्याच वेळी वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटाचे भाजपच्या सुधाकर शृगांरे यांनी दोन वर्षांपासून नियोजनबद्धरित्या कामे सुरु केली होती. भाजपच्या सर्व गटातटांना आपल्या उमेदवारीसाठी अनुकूल करुन घेतले. संघाच्या पातळीवरही त्यांनी स्वतःच्या नावाला प्रमोट करणारी फळी तयार केली. यात मुख्य भूमिका होती ती लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची. आता सुधाकर शृंगारे यांना निवडून आणण्याची सर्व जबाबदारी त्यांच्या शिरावर पडली आहे.

सुनील गायकवाड यांचे तिकीट का कापले याचे सर्वप्रथम त्यांना उत्तर द्यावे लागेल. ही बाब त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याचवेळी सुनील गायकवाड यांना मानणारे कार्यकर्ते कोणती भूमिका घेतील, याचाही परिणाम निवडणुकीवर होणार आहे. यावर सुनील गायकवाड यांनी मात्र पक्षाच्या आदेशाचे पालन करत असल्याचं सांगितलं आहे. 'मी कोणत्याही गटात नाही. माझ्या कामाचं योग्य मूल्यमापन झालं नाही. शेवटी पक्षाने निर्णय घेतला तो मला मान्य आहे. पक्षाचे काम मी करत राहणार आहे. काही ठराविक नेत्याचे ऐकले गेले, हे सत्य आहे' अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

लातूरमध्ये आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुनील गायकवाड गैरहजर होते. या बाबत पालकमंत्री संभाजी पाटील यांना विचारले असता ते त्याच्या खासगी कामासाठी बाहेर गेले आहेत. ते नाराज नाहीत, माझे आणि त्यांचे आताच बोलणे झाले आहे' असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

पक्षात गट तट निर्माण करायला पाहिजे, स्वत:चा ग्रुप करायला पाहिजे, मात्र ते मी केले नाही ही माझी चूक होती असे मत लातुरचे मावळते भाजपा खासदार डॉ सुनील गायकवाड़ यांनी व्यक्त केले आहे. त्यांना यावेळी पक्षाने उमेदवारी दिली नाही. पक्ष कधी ही एका व्यक्तिवर चालत नसतो मी म्हणजे पार्टी अस ज्यावेळी होते त्यावेळी पार्टीचे अस्तित्व धोक्यात येते असा आरोप संभाजी पाटिल निलगेकर याचे नाव न घेता केला आहे.

लातूर लोकसभेचे मावळते खासदार सुनील गायकवाड़ यांना यावेळी पक्षाने संधि दिली नाही त्याच्या ऐवजी सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 साली विक्रमी अडीच लाख मतानी ते निवडून आले होते मात्र ऐसे असताना ही त्याना यावेळी पुन्हा संधी देण्यात आली नाही. यावेळी संधी न मिळण्यामागे पालकमंत्री संभाजी पाटिल यांचा मोठा हात होता हे उघड़पने न सांगता, मी म्हणजे पार्टी असे ज्यावेळी होते त्यावेळी पार्टीचे अस्तित्व धोक्यात येते असा सूचक इशारा सुनील गायकवाड यांनी दिला आहे.