शिरुर: राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. एकदाही शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकाही फेरीत आघाडी घेता आली नाहीत. अखेर अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव करत जायंट किलर ठरले होते. यंदाही त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करता येणार का, याकडे नजरा लागल्या होत्या. 

LIVE Updates:

शिरुर लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात होते. सध्याच्या घडीला अमोल कोल्हे हे 33200 मतांनी आघाडीवर आहेत. ही सकाळी अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी असून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
अमोल कोल्हे शरद पवार गट        विजयी
शिवाजीराव आढळराव पाटील अजित  पवार गट (राष्ट्रवादी)       पराभूत
आफताब अन्वर मकबूल शेख वंचित बहुजन आघाडी       पराभूत


शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची विधानसभानिहाय टक्केवारी

शिरुर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 60.62 टक्के मतदान झाले होते. परंतु, यंदा शिरुरमध्ये मतदानाचा टक्का किंचित घटला. निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार शिरुरमध्ये 54.16 टक्के मतदान झाले. शिरुरच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा कमी मतदान झाले.  मतदानातील ही घट कोणाच्या पथ्थ्यावर पडणार, हे पाहावे लागेल.


आंबेगाव- 62.95 टक्के
भोसरी- 47.71 टक्के
हडपसर- 49.41 टक्के
जुन्नर- 58.16 टक्के
खेड-आळंदी- 57.76 टक्के


शिरूर लोकसभा मदरसंघातील आमदार संख्या – 6

जुन्नर– अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)

आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

खेड-आळंदी – दिलीप मोहिते पाटील

शिरूर – अशोक पवार

भोसरी – महेश लांडगे (भाजप)

हडपसर – चेतन तुपे


2019 मध्ये शिरुरमध्ये लोकसभेचा निकाल

गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी तब्बल 58 हजार मतांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना अस्मान दाखवले होते. एकेकाळी शिरुर भागात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, अमोल कोल्हे हे त्यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते. 


अमोल कोल्हे-  6,35,830 (49.17 टक्के)

शिवाजीराव आढळराव पाटील- 5,77, 347 (44.65 टक्के)


शरद पवार गट Vs अजित पवार गट यांच्यातील वर्चस्वाची लढाई

शिरुर लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या समस्या, शहरीकरण, बेरोजगारी आणि विकास हे मुलभूत मुद्दे प्रचाराचा भाग होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य रोख हा शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील वर्चस्ववादाची लढाई हाच राहिला. याशिवाय, अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील शा‍ब्दिक कलगीतुराही चांगलाच रंगला. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपापल्या उमेदवारासाठी शिरुरमध्ये सभा घेतल्या. या दोन्ही नेत्यांची मतदारसंघातील भाषणे चांगलीच गाजली. त्यामुळे शिरुरची जनता शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात मत टाकणार, हे पाहावे लागेल. याशिवाय, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटकपक्षांमध्ये होणारे व्होट ट्रान्सफर हा कळीचा मुद्दा ठरु शकतो. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात होते. लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे अजितदादा गट, शिंदे गट आणि भाजपकडून आढळराव पाटलांच्या पारड्यात कशाप्रकारे व्होट ट्रान्स्फरिंग होते, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

आणखी वाचा

Nashik Lok Sabha Result 2024 : नाशिकमधून गोडसे की वाजे, कोण उधळणार गुलाल? वाचा लोकसभेचा निकाल एका क्लिकवर