Shirala Vidhan Sabha constituency : जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघात यंदा राजकीय गणितं बदलली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजपचे सत्यजीत देशमुख अशी रंगतदार लढाई होत आहे. सम्राट महाडिक यांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलं असून त्यांची ताकद आता सत्यजीत देशमुखांच्या पाठीशी आहे. तर दुसरीकडे पारंपरिक विरोधी असलेले शिवाजीराव नाईक गटाने मानसिंगराव नाईक गटाच्या मागे ताकद लावली आहे. जयंत पाटलांनीही त्यांची यंत्रणा मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी लावल्याने यंदा शिराळ्यामध्ये काट्याची लढत होणार हे निश्चित आहे. 


2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं? 


2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विरुद्ध शिवाजीराव नाईक हे पारंपरिक विरोधक मैदानात होते. त्यावेळी सम्राट महाडिकांनी बंडखोरी केली होती. मानसिंगराव नाईक यांनी 1,01,933 मतं मिळवून विजयी गुलाल उधळला होता. तर विरोधी शिवाजीराव नाईक यांना 76,002 मतं मिळाली होती. तर अपक्ष म्हणून लढणाऱ्या सम्राट महाडिकांना 46 हजार मतं मिळाली होती. 


शिराळा विधानसभा मतदारसंघातील आजची स्थिती


महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मानसिंगराव नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून भाजपने सत्यजीत देशमुखांना उमेदवारी दिली. या ठिकाणी भाजपच्या सम्राट महाडिकांनी बंडखोरी करत अपत्र अर्ज भरला होता. पण त्यांची बंडखोरी रोखण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलं. त्यामुळे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होणार आहे. सत्यजीत देशमुख हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुखांचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा या परिसरात मोठा जनसंपर्क आहे.


सांगलीतील शिराळा हा मतदारसंघ लोकसभेसाठी हातकणंगलेमध्ये येतो. या ठिकाणी महाविकास आघाडीला 9 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. त्याचा फायदा आता विधानसभेलाही होईल अशी आशा महाविकास आघाडीला आहे. शिराळा मतदारसंघामध्ये एकूण 3,05,208 मतदार आहेत. त्यापैकी 1,55,376 पुरूष मतदार तर 1,49,829 स्त्री मतदार आहेत.  


शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील 48 गावांचा समावेश होतो. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची ताकद मोठी आहे. तसेच या ठिकाणी महाडिक गटाचीही ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 


ही बातमी वाचा: