Sanjay Gaikwad: विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यात बुलढाणा मतदार संघातून शिंदे गटाचे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचा अवघ्या 800 मतांनी विजय झाला. मात्र हा काठावरील विजय त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसतंय. संजय गायकवाड यांनी आपल्याच पक्षातील नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना माझ्याशी त्यांनी गद्दारी केल्याचं म्हटलं आहे. इतकंच काय तर प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर तर भाजपा संजय कुटे यांनी अनिल परब यांना फोन करून हा सर्व कट केला असा गौप्यस्फोट केल्याने शिवसेनेत आता वाद उफाळून आल्याचं चित्र आहे.
संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
मी या विधानसभेच्या निवडणुकीत एकटाच लढलो व कमी मतांच्या फरकाने विजयी झालो. माझ्याच पक्षातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करून माझ्या विरुद्ध रविकांत तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याच सांगितलं.रविकांत तुपकर यांची उमेदवारी पक्की होती मात्र प्रतापराव जाधव यांनी फोन केल्यावर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार बदलला, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत- संजय गायकवाड
भाजपाच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याची शिफारस केलीय. माझ्याच विरोधात महायुती व माझ्या पक्षातील नेत्यांनी गद्दारी केली, याची लेखी तक्रार मी करणार आहे. निवडणूक आयोग झोपा काढत आहे. उमेदवार कोट्यावधी रुपये वाटत आहेत, असं संजय गायकवाड यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत ही आमची इच्छा आहे. तसेच एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेणार नाहीत, असंही संजय गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय गायकवाड फक्त 800 मतांनी विजयी-
बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड फक्त आठशे मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालात बुलढाणाची जागाही शिवसेनाच्या संजय गायकवाड यांनीच जिंकली होती. तर परत एकदा बुलढाण्यात आमदार म्हणून संजय गायकवाड यांनाच पसंदी दिली आहे. बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाड यांना जवळपास 90 हजार मतदान झाले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांना 88 हजार मतदान झाले. या काटे की टक्करमध्ये संजय गायकवाड यांनी बाजी मारली. मात्र थोडक्यात बचावेलेल्या संजय गायकवाड यांनी आपल्या घटलेल्या मताधिक्याचे खापर थेट केंद्रीय मंत्री आणि महायुतीच्या इतर नेत्यांवर फोडत आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.