मुंबई : शिवसेना महायुतीच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबाबत शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार अरविंद सावंत (Arvind sawant) यांनी आक्षेपार्ह विधान केले होतं. त्यावरून, राजकीय वातावरण तापलं असून खासदार अरविंद सावंत यांच्याविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात भादंवि 79, कलम 356 (2) अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. त्यासंदर्भाने खासदार सावंत यांनी आपली बाजू मांडली. तसेच, महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांवर व सरकारवर तोफ डागली. तर, ती माझी मैत्रिण होती, मी तिचा अपमान कशाला करेल, असेही सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


मला कुठलीही नोटीस न देता गुन्हा दाखल केलाय, त्याबद्दल पोलिसांचं कौतूक. यापूर्वी, पोलिस स्थानकात गोळी झाडली गेली, ठाण्यात अत्याचार झाला, महिला पत्रकाराला काय काय बोलले, तेव्हा गुन्हा दाखल झाला का? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, सत्तेत असाल तर काही करा गुन्हा दाखल होणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलं गेलंय. ती माझी मैत्रिण होती, मी तिचा अपमान कशाला करेल. ही ढोंगी लोकं आहेत, तुमच्या पक्षात सत्तेत असाल तर काहीही करा असं आहे हे. तुम्हाला एथिक्स नाही, चरित्र नाही, तुम्ही भ्रष्ट लोकं आणि ते आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं, असे म्हणत गुन्हा दाखल झाल्यासंदर्भात खासदार सावंत यांनी आपली बाजू मांडली.


काहीच नाही करता येत मग, अरविंद सावंतवर गुन्हा दाखल करा, मग त्यालाच बदनाम करा. पण, नोटीस न देता पोलीस एफआयआर दाखल कसं करु शकतात, असा सवाल देखील सावंत यांनी विचारला आहे. संजय राठोडांविरोधात गप्प का राहिलात, ऐन निवडणुकीत यांचा काही वापर करता येईल का? म्हणून सर्व सुरू आहे. ही सर्व मोदींची चेले मंडळी आहेत. आता, आम्ही कायदेशीर कारवाईला सामोरे जावू, असे अरविंद सावंत यांनी म्हटले. 


शिंदेंच्या दोन गटात राडा


दरम्यान, शिवसेना उमेदवार शायना एनसी यांच्या समर्थनार्थ नागपाडा पोलिस स्थानकात आलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्येच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये नागपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली. शायना एनसी पोलीस स्टेशनच्या आवारातून बाहेर पडताच दोन गटातील वादाला सुरुवात झाली, अंतर्गत वादातून दोन गटात तणाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. 


हेही वाचा


महायुतीत जुंपली, औरंगजेब, रझाकार म्हणत रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा