Suhas Palshikar on Maharashtra Vidhansabha Election : "गेल्या अनेक निवडणुकांमध्ये यश आला नसलेला पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. समाजातील वंचित घटकाला विचारधारेने एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. व्यवहारात मात्र, त्यांचा पक्ष द्विधुरीय पद्धतीत कुठंही बसणारा नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळे आक्षेप घेतले जातात. आरोही केले जातात. वंचितमुळे कोणी एकच पडतं असं नाही. त्यांचा फटका कोणालाही बसू शकतो. जिथे भाजप आणि शिवसेनेला ओबीसींची मतं मिळत असतील, तिथं वंचितचा तगडा उमेदवार असेल तर त्यांनाही फटका बसू शकतो. तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत पूर्वापार झालेलं आहे. त्यामुळे निवडून येण्यापेक्षा किती जणांना फटका बसेल हे पाहावे लागेल", असं राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकर म्हणाले आहेत. सुहास पळशीकर यांनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सखोल विश्लेषण केलं आहे.
मनसेचा शिंदेंना फटका बसू शकतो
सुहास पळशीकर म्हणाले, महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेलाही कधी काही जमलेलं नाही. क्वचित प्रसंगी त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत. शिवसेनेत फुट झाल्यामुळे मुंबईत मराठी मतांचं काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. त्याचा फायदा मनसे मिळवू शकते. लोकसभेचा निकाल पाहिला तर मनसेचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला फटका बसू शकतो. कारण मुंबईतील मराठी भाषिक भागांमध्ये त्यांना पाठिंबा मिळाला होता. मनसेचा मतदार जास्त करुन मराठी आणि मध्यमवर्गीय आहे. जो भाजप आणि शिवसेनचा पूर्वापारचा मतदार आहे, तोच आहे. त्यामुळे त्याठिकाणी मनसेचा शिंदेंना फटका बसू शकतो. मात्र, नाशिक, पुण्यात मनसेचं स्थानिक राजकारण आहे. त्या स्थानिक राजकारणात कोणालाही फटका बसू शकतो.
पुढे बोलताना पळशीकर म्हणाले, महाराष्ट्रात कोणाला बहुमत मिळेल का? हे विचारण्यापेक्षा कोणाला तरी बहुमत मिळेल का? असा प्रश्न विचारायला पाहिजे. महाविकास आघाडी आणि महायुती बहुमताच्या बाजूला राहतील, ही मला शक्यता जास्त वाटते. हे उमेदवार ठरण्याच्या आधी आणि प्रचार सुरु होण्याच्या आधी मी सांगत आहे. रहे लक्षात ठेवलं पाहिजे. सध्या पक्षांची विश्वासार्हता कमी होतं आहे.
एमआयएमचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो
याशिवाय एमआयएमचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो. एमआयएम हा पक्ष निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उतरला आणि काही ठिकाणी त्यांनी मतं घेतली तर ती निश्चितपणे महाविकास आघाडीची मतं असणार आहेत. वंचित आणि एमआयएमला पक्ष वाढवण्यासाठी निवडणुकीत उतरणे भाग आहे. मात्र, द्विधुरीय राजकारण झालं तर वंचित आणि एमआयएमचे मतदार ज्याला पाडायचं आहे, त्याच्या विरोधात मतदान करु शकतात. जसं लोकसभेत झालं तसंही होऊ शकतं. महाविकास आघाडीसोबत समझोता केला नाही, तर या दोन पक्षांचं नुकसान होऊ शकतं, असंही पळशीकर यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
एन्काऊंटर स्पेशालिस्ट, नाव बुलेट पाटील; नवाब मलिकांविरुद्ध लढणारा महायुतीचा उमेदवार कोण?