पाटना : गेल्या तीन दशकांपासून भाजपमध्ये असलेले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सिन्हा यांना काँग्रेस पटना साहिब येथून उमेदवारी देणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. पटना साहिबमधून भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सिन्हा यांचा रवीशंकर प्रसाद यांच्याशी सामना होणार आहे.


छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाचे जाहीर कौतुक केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चां खऱ्या ठरल्या आहेत. 28 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते की, जी आश्वासनं देण्यात आली होती, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मी आशा करतो की लवकरच ती आश्वासनं पूर्ण होतील. पुढे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले होते की, ''मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में हम न होंगें."