मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात आज मुंबईत दिग्गज नेत्यांच्या सभांची पर्वणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजच्या सभेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर ही ऐतिहासिक सभा होत असल्याने मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्राला या सभेची उत्सुकता लागून राहिली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीचीही सभा होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसीत ही सभा होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी येथील सभेला संबोधित केले. शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, मोदींनी पुण्यातील सभेतून भटकती आत्मा म्हणत शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल केला होता. त्यावरुनही पवारांनी बीकेसीतील सभेतून पलटवार केला.


बीकेसीतील सभेपूर्वी शरद पवार यांनी भिंवडीत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासाठी सभा घेतली. देशातील शेतकरी, कष्टकरी संकटात असून अल्पसंख्यांक समाजही चिंतेत आहे, असे म्हणत मोदी सरकारच्या धोरणांवर पवारांनी येथील भाषणातून टीका केली होती. तसेच, तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील ही बाब भाजपवाले चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत, असे म्हणत नाव न घेता शरद पवारांनी मोदींच्या भाषणावर पलटवार केला. देशात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. मात्र, देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते. भिवंडीतील भाषणानंतर शरद पवारांनी बीकेसीतील सभेतूनही मोदींवर हल्लाबोल केला. देशातील शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.


डॉ. बाबासाहेबांचं संविधान आणि तुमचा मुलभूत अधिकार वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पंतप्रधानांसमोर एखादा कोणी भूमिका मांडत असेल, तर त्यांना उध्वस्त करण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत चांगलं काम केलं. शाळा, आरोग्याच्या सुविधा देऊन दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करुन अरविंद केजरीवाल काम करत आहेत. मात्र, नरेंद्र मोदींनी त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकलं. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे.


नकली शिवसेनेवरुन पवारांचा संताप


तुम्ही नकली शिवसेना म्हणताय, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला संकटकाळात वाचवायचं काम केलं, हे महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्ही जरी विसरला असाल तरी. बाळासाहेब ठाकरेंचा विचार जे उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत, त्या विचाराच्या पाठिशी शक्ती उभी केल्याशिवाय महाराष्ट्रातील मराठी तरुण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील माणूस राहणार नाही, असे शरद पवारांनी म्हटले. मी म्हणेल त्या पद्धतीने लोकशाही हाच एककलमी कार्यक्रम देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलाय. त्यामुळेच, तुमचे आणि माझे अधिकार हे काढून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही आमच्याबद्दल काहीही म्हणले, आमच्यावर कितीही टीका टिपण्णी केली, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील माणूस ढुंकूनसुद्धा बघणार नाही. 


हा आत्मा सत्तेतून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही


आमच्याबद्दल बोलताना तुम्ही म्हणालात की, या महाराष्ट्रात भटकती आत्मा आहे. पण, आत्मा कधी असतो, माणूस गेल्याच्या नंतर असतो, त्यांना चिंता पडलीय आम्हा लोकांची. भटकती आत्मा... मी एवढचं सांगतो, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पलटवार शरद पवार यांनी बीकेसीमधील सभेतून केला. तसेच, लोकशाही संकटात आहे, संविधान संकटात आहे, महाराष्ट्राचं हित संकटात आहे. यातून सुटका करायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्र राहावं लागेल. म्हणून, या निवडणुकीच्या प्रक्रियेतून भाजप व मोदी या प्रवृत्तीचा पराभव करणं हे तुमचं व माझं काम आहे, असेही शरद पवार यांनी म्हटलं.