बारामती: पवार घराण्यातील द्वंद्वामुळे लोकसभेप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण सुरुवातीलाच प्रचंड तापले आहे. कारण, आता स्वत: शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांची नेहमीची चाकोरी सोडून अजित पवार यांची नक्कल केली आहे. अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

अजित पवार यांची नक्कल केल्यानंतर शरद पवार यांनी या सगळ्यावर आपली भूमिका मांडली. हा प्रश्न भावनेचा नाही. हा मुद्दा तत्त्वाचा आणि विचारांचा आहे. आम्ही गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहे. मी याच विचारांनी काम करतो. गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या सर्वांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. या विचारधारेसाठी मी काम करणार. हीच माझी पद्धत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

मी गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक तालुके पालथे घातले आहेत. कारण मला महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे. राज्याची सत्ता सामान्यांच्या हाती द्यायची आहे. ते करायचं असेल तर तुम्ही-आम्ही एकजुटीने आपली शक्ती उभी केली पाहिजे, असे सांगत शरद पवार यांनी बारामतीच्या जनतेला साद घातली.

Continues below advertisement

शरद पवारांची अजितदादांवर घणाघाती टीका

बारामतीमधील पहिल्याच सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, घरात दोन भाऊ असतील तर एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी करायची असते. आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली, आम्ही रोजगार दिले. बारामतीत मलिदा गँग शब्द आहे. आम्ही ही  गँग कधी वाढू दिली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

मी पक्षात मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. पण सत्ता नाही म्हणून सहकाऱ्यांनी आमचा साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि  पहाटे शपथ घेतली, राज्यपाल यांना उठवले कशासाठी? चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का? घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन कुणी केला? हा पक्ष मी काढला. मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला. केंद्र सरकारमध्ये चक्र फिरली आणि आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. पक्ष चिन्ह दुसऱ्याला देऊन टाकलं. आयुष्यात कधीही मी कोर्टात गेलो नाही. काही लोकांनी आमच्यावर खटला दाखल केला. आमच्यावर केस केली, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा

'आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात...', अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार म्हणाले, 'आजीला राजकारणात...'