Sharad Pawar on Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केलाय, मतदानाला अवघा एक आठवडा उरला आहे. महाराष्ट्र काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्या उमेदवारांसाठी प्रत्येक मतदारसंघात जात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच आहे. दरम्यान, शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील? यावर भाष्य केलं आहे. ते बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
शरद पवार काय काय म्हणाले?
आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की, लोक निवडून येतात. पक्ष सोडून जातात. असं दोन-तीन वेळेस घडलं. ज्या वेळी असं घडलं त्यावेळी जे सोडून गेले. त्यांची संख्या साधारण 45 ते 50 च्या आसपास होती. निवडून आले एका पक्षाच्या विचारावर आणि सोडून गेले दुसरीकडे , हे लोकांना पसंत पडत नाही. त्यामुळे आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत जे लोक सोडून गेले, त्यातील मोठ्या प्रमाणातील लोक निवडून आले नाहीत. जेवढे लोक सोडून गेले, त्यापेक्षा निदान 2-3 जास्त निवडून आले. आता यावेळेसही आमच्या पक्षाचे 50 ते 60 आमदार निवडून यायला फारशी अडचण दिसत नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील दोन पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदेंनी बंड करत वेगळी शिवसेना निर्माण केली. तर अजित पवारांनी काकांची साथ सोडत राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव देखील मिळवलं. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत पक्षातील बहुसंख्य आमदार गेले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार अजित पवार गटात गेले. त्यामुळे शरद पवारांकडे फार कमी आमदार उरले होते. दरम्यान, एवढे लोक सोडून गेलेले असताना देखील शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीतही चांगल्या जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या