इंदापूर: इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यामुळे इंदापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती संपूर्णपणे बदलल्याचं दिसून आलं. शरद पवारांसह पाटलांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं होतं. इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मात्र, अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रवीण माने असा तिरंगी सामना रंगला. मात्र, यामध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. 117236 दत्ता मामा भरणे यांचा विजय झाला आहे, तर 97826 इतकी मते हर्षवर्धन पाटलांना मिळाली आहेत. तर अपक्ष प्रवीण माने यांना 37917 इतकी मते मिळाली आहेत.
इंदापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी असा सामना झाला, ही जागा प्रतिष्ठेची बनली होती. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात जरी ही लढत होत असली तरी देखील अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तेव्हा इंदापुरकरांनी विजयाची माळ दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यात टाकत पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे.
मतदारसंघात हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयामुळे राजकीय उलथापालथ
लोकसभेला इच्छुक असलेले हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना विधानसभेला देखील उमेदवारी मिळेल की, नाही याबाबत शंका वर्तवली जात होती. या मतदारसंघात विद्यमान आमदार हे दत्तात्रय भरणे आहेत, अजित पवार सत्तेत गेल्यानंतर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबतचे अनेक तर्क वितर्क लावले जात होते, त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला, आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूरमध्ये बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे नातेवाईक असलेले अप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार गटात होते. मात्र, त्यांनी अजित पवारांकडे जाणं पसंत केलं आणि त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर इंदापुरसह राज्यभरात नाव असलेल्या सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते पण हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इंदापुरचे स्थानिक नेते भरत शहा हे देखील शरद पवारांसोबत होते पण आता ते बाहेर पडले. नंतर शरद पवारांनी इंदापुरातील नाराज स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या, मात्र त्याचा फायदा निवडणुकीत झाला नसल्याचं चित्र आहे.
विधानसभा मतदारसंघातील उमेदवार
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने या तिघांमध्ये तिरंगी लढत झाली आहे.
2019 चा निकाल काय?
1995 ते 2004 पर्यंत इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा होता. हर्षवर्धन पाटील यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. इंदापुरातील राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. 2009 मध्ये, हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. या वेळीही त्यांना विजय मिळाला. मात्र, 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांनी विजय मिळवला. 2019 मध्येही दत्तात्रेय भरणे यांनी विजय मिळवला. 114,960 मतांनी बाजी मारली. यावेळी देखील विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरली दत्तात्रेय भरणे यांनी विजय मिळवला.