पुणे: सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच आहे, ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे. अशी प्रतिक्रिया शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. बेटेंगे तो कटेंगे या प्रचारावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण धर्मा-धर्मात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये. पण भाजप (BJP) आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचे भान नाही असेही शरद पवार म्हणाले. जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांना महाराष्ट्रात आणले जात आहे, असेही शरद पवार म्हणाले. 


नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत अजिबात चिंतेचे कारण नाही 


नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कारणच नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे. इथले मतदार भाजपच्या विचारसरनीला अजिबात पाठींबा देणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली. 


अशोक चव्हाण म्हणजे संधीसाधु 


चव्हाण कुटुंबाला काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले, देशाचे गृहमंत्री पद, अर्थमंत्री पद, सरंक्षण मंत्रिपद दिले , स्वतः अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पद दिले. पक्षानी आणखी काय द्यायचे? लोक समजतात आता त्यांना काय शिकवायचे ते शिकवतील, अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. शंकरराव चव्हाण यांनी एकदा काँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढला होता. पण त्यांच्या नावात काँग्रेस हा शब्द होता, विचारधारा काँग्रेसची होती, पण अशोक चव्हाण एकदम विरोधातील विचारधारेसोबत गेले, हा संधीसाधूपणा आहे असेही शरद पवार म्हणाले. 


'बटेंगे तो कटेंगे'वर काय म्हणाले अजित पवार?


बटेंगे तो कटेंगे याबाबत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एक्स पोस्ट वरती बोलताना अजित पवार म्हणाले, मी महायुतीमध्ये एक घटक पक्ष आहे, आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम वरती एकत्र आलेलो आहोत. विचारधारा भिन्न आहेत. पाठीमागच्या काळामध्ये अडीच वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत सरकारमध्ये घालवले. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि आमची विचारधारा वेगळी होती. परंतु त्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती आम्ही एकत्रित आलेलो होतो. आता देशाचा विकास व्हावा राज्याचा विकास व्हावा या मुद्द्यावर आम्ही या सरकारमध्ये सामील झालेलो आहोत. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतो आहे, मी आजही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी माझं मत निगडित आहे. आत्ताही आहे आणि पुढेही राहणार आहे. ही माझी भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे असं अजित पवार म्हणालेत. 


आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही ते इतर राज्यांमध्ये कदाचित चालत असेल. ते इतर राज्याचे प्रमुख नेते आहेत भाजपचे प्रमुख नेते आहेत. एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. जर कोणी काही बोललं तर आम्ही त्यावर आमचं स्पष्ट मत मांडतो, आमची भूमिका स्पष्ट करतो ट्विट करतो. तुमच्या माध्यमातून सांगतो. तुमच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो असे पुढे अजित पवार म्हणालेत.


हे ही वाचा