मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं वाटत नसल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

भाजप सर्वात मोठा पक्ष असू शकेल, मात्र त्यांना बहुमतासाठी लागणारे आकडे मिळू शकणार नाहीत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना दुसऱ्या पक्षांची मदत घ्यावी लागेल. परंतु आघाडी करण्यासाठी मोदींना स्वीकारलं जाणार नाही. पर्यायाने मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असं भाकित पवारांनी वर्तवलं.

मला राजकारणात 52 वर्ष झाली. राजकारणातून बाहेर पडण्याचा कधी तरी विचार करायला हवा, म्हणून मी निवडणुकीतून माघार घेतली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी ना कधी हरले, पण मी कधीच हरलो नाही. त्यामुळे पराभवाच्या भीतीने मी माघार घेतल्याचं भाजपचं वक्तव्य बालिशपणाचे आहे, असे पवार म्हणाले.

VIDEO | निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष असू शकेल मात्र मोदी पंतप्रधान नसतील : शरद पवार | एबीपी माझा



आंबेडकर कधी आमच्यासोबत होते का? काहीही गळ्यात मारु नका, असंही शरद पवार खोचकपणे म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी बोलणं झालं आहे. त्यांच्या जागेची मागणी पूर्ण होईल. स्वाभिमानी सोबतची राष्ट्रवादीची चर्चा समाधानी झाल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं.

माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, त्यांना काय वाटेल? : शरद पवार


सुजय विखे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. अमुक एका जागेचा हट्ट करतो. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही, आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा. माझ्या घरातला मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, असाही टोला पवारांनी लगावला.

शरद पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघातील माघार हा युतीचा विजय असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याची बोचरी टीकाही फडणवीसांनी केली होती. एकदा सभेत मोदी म्हणाले होते की, शरद पवार हवा का रुख भाप लेते है, यावेळी त्यांना हे समजलं असावं म्हणून पवारांनी माघार घेतली असावी” असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.