यवतमाळमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. सरकार सत्तेचा गैरवापर करून राजकीय व्यक्तींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आणि विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सरकार सीबीआय, आयबीच्या माध्यमातून पुरेपूर करत असल्याचा टीका शरद पवार यांनी केली. विशेष म्हणजे या देशामध्ये सांप्रदायिक विचारातून सत्ता आणि मतं प्राप्त करून घेण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची आहे. काही ठिकाणी झुंडशाही होत आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
यावेळी ते म्हणाले की, ज्याच्याशी माझा संबंध नाही, त्या विषयात माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यात माझं नाव गोवलं. मग फरार दाखवण्यापेक्षा मीच येतो असे सांगितले. या राज्यात निर्दोष माणसाला गुन्हे दाखल करून अटक केली जातेय, असेही ते म्हणाले.
मी संरक्षण मंत्री असतांना मी राफेलच्या कंपनीत तत्कालीन सेक्रेटरी व्होरा यांच्या समवेत गेलो होतो. राफेल हे उत्तम विमान आहे, यात शंका नाही, आम्हाला राफेल योग्य वाटलं. तपासणी करुन आता हे विमान खरेदी केले गेले याचे स्वागत करतो. पण ज्या पद्धतीने राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवले ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले. नवीन ट्रक घेतला तर त्यावर लिंबू आणि मिरची टांगून ठेवतात. जेणेकरुन त्या ट्रकला शाप लागणार नाही. पण नेमकं राफेलला कशाचा शाप लागेल? असा सवाल करत त्यांना भीती वाटत असेल त्यामुळे त्यांनी लिंबू ठेवले असेल तर धन्य आहे, असे पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, निवडणूक काळात 10 रुपयात जेवण देण्याची घोषणा उद्धव ठाकरे करत आहेत. केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता आहे मग हे आजपर्यंत का केले नाही. ही घोषणा म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे, असे पवार म्हणाले. नागपूर वगळता या राज्यातील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणावर खड्डे आहेत. या प्रश्नाची सोडवणूक करण्याची कुवत नाही, असेही ते म्हणाले.