पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. "मी माढ्यातून निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह आहे. मात्र पक्षाने अद्याप माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली. मी स्वत: उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

तसंच माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांना आम्ही एकत्र केलं. दोन दिवसांत माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल याबाबत निर्णय घेऊ, असं पवारांनी स्पष्ट केलं.

विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेच्या उमेदवारीवरुन आज पुन्हा खल झालं. माढ्यातून शरद पवार यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर चर्चा रंगली होती. विजयसिंह मोहिते-पाटलांना डावलल्यामुळे माढा लोकसभेतल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं होतं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात माढ्याबाबत पुनर्विचार सुरु असल्याची चर्चा होती. या जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठकही पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

मी आतापर्यंत चौदा निवडणुका लढलोय. कधीही अपयश न घेणारा. तुमच्यापैकी काहींनी बातमी चालवली की मी माघार घेतली. चौदा निवडणुकांमधे मी माघार घेतलेली नाही, असं शरद पवार यांनी नमूद केलं.

पार्थला संधी द्यायचं ठरवलं
तसंच मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही होत आहे. त्यामुळे एका घरातील किती उमेदवार द्यायचे असा प्रश्न होता. त्यामुळे मी पार्थला संधी द्यायचं ठरवलं.

नगरची जागा राष्ट्रवादीचीच
अहमदनगरच्या जागेवरुन सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. याविषयी विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातील सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. ही जागा आम्ही जिंकू शकतो. आम्हीच या मतदारसंघातून बाळासाहेब विखे-पाटील यांचा पराभव केला होता. सुजय विखे-पाटील भाजपमध्ये जातील असं वाटतं नाही. त्यांच्या कॉंग्रेस निष्ठेबद्दल माझ्या मनात शंका नाही."

'मी राज ठाकरेंना पढवलं, ठीक आहे'
हल्ली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीतून येते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. याबाबत शरद पवार म्हणाले की, "राज ठाकरेंना मी भेटलो. पण आघाडीत या असं मी त्यांना कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री म्हणाले की राज ठाकरेंना मी पढवलं. ठीक आहे. बारामतीची परंपरा आहे. मोरोपंत बारामतीचे होते, पेशवे काळात.

शरद पवारांसमोर राडा करणारे शेखर गोरे काय म्हणतात?

शरद पवार माढ्यातून फायनल, बैठकीत शिक्कामोर्तब


शरद पवारांची पत्रकार परिषद




पत्रकार परिषेदेतील महत्त्वाचे मुद्दे :

सुप्रिया सुळे बारामतीमधून लढणार आहे, पार्थ पवार यांनी लोकसभा लढवावी अशी मागणी होत आहे त्यामुळे एकाच घरातील तिघांनी निवडणूक लढवणं योग्य ठरणार नाही

आमची यादी तयार आहे. आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहतो आहे.

यावेळी आम्हाला अनुकूल अशी परिस्थिती आहे

नव्या पिढीला प्रोत्साहित करावं

अहमदनगर राष्ट्रवादी पक्ष चांगल्या स्थितीत असताना ती जागा काँग्रेसला सोडण्याचं कारण नाही

बाळासाहेब विखेंचा पराभव आम्हीच केला होता. त्यामुळे ही जागा आम्ही जिंकू शकतो. हा विश्वास आहे.

सुजय विखे आघाडीत नव्हते, त्यांचं काही योगदान आघाडीत नव्हतं

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या चर्चेत मी कधीच नव्हतो

पुण्यात मी एकही नाव दिलेलं नाही

पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक असतानाही पुण्याची जागा आम्ही मागितली नाही. पुणे जिल्ह्यातील चार पैकी तीन जागा राष्ट्रवादीकडं आहे. सगळ्या जागा मागणं योग्य नाही