मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची आज घरवापसी होणार आहे. शरद सोनावणे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नकारल्याने त्यांनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता.
मनसेच्या तिकीटावर ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. शरद सोनावणे हे एकमेव उमेदवार आहेत जे मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षात सोनावणे यांचा मनसेच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नव्हता. ते भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वावरताना दिसत होते.
तेंव्हापासून सोनावणे मनसे सोडणार, अशी माहिती येत होती. सोनावणे यांनी जुन्नरच्या स्थानिक राजकारणाचा विचार करीत आपल्या समर्थकांशी पुढील वाटचालीविषयी संवाद साधला. समर्थकांनी सुचविलेल्या निर्णयानुसार त्यांनी शिवसेनेत परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनावणे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या निर्णयाची कल्पना दिली होती. तसंच मनसेत दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. ते मनसेचे एकमेव आमदार असल्याने शिवसेनेत प्रवेश करताना विधिमंडळाच्या पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत जुन्नरमधून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे आज शिवसेनेत प्रवेश करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2019 12:39 PM (IST)
शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नकारल्याने त्यांनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -