Maharashtra Vidhan Sabha Election 2024 परळी : बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून (Parli Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात शरद पवार नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देतात? त्याची उत्सुकता लागली होती. अशातच आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुंडेंच्या विरोधात शरद पवार कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अशातच पवारांची खेळी या मतदारसंघात महत्त्वाची मानली जाते आहे.
दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार असलेल्या राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजेभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत.त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे बोलले जात आहे.
परळी मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ
परळी विधानसभा मतदारसंघातून राजेभाऊ फड हे इच्छुक आणि संभाव्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मागील पंधरा दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. बैठकी देखील होत आहेत. मात्र आज शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख हे मराठा कार्ड देऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राजेभाऊ फड यांनी उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करेल, असे सांगितले होते. मात्र फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते मात्र आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ झाला आहे.
कोण आहेत राजेसाहेब देशमुख?
- मागील अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सक्रिय काम करत आहेत
- स्वर्गीय विमल मुंदडा त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे
- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण सभापती पद भूषविले आहे
- मागील अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत
- लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला त्यात जरांगे फॅक्टर आघाडीवर होता
- लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे संघर्ष पाहायला मिळाला
- परळी मतदारसंघ मराठा बहुल आहे त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांचे वैयक्तिक संबंध आहेत
हे ही वाचा