मुंबई : निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज तारखा जाहीर होतील. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय देखील झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आघाडी घेतली जाण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लवकरच पहिली यादी जाहीर केली जाईल.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी लवकरच
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागा लढवल्या त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवला. लोकसभेतील शरद पवारांच्या पक्षाची कामगिरी पाहून त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु झाले आहेत. समरजीतसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या दृष्टीनं महत्त्वाची असल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी लवकरच केली जाणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजेच 19 किंवा 20 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी येणार आहे.
मविआच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. सध्या महाविकास आघाडीमध्ये 230 जागांवर एकमत झालं असल्याची माहिती आहे. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर होणार आहेत. मविआमध्ये आता केवळ 58 जागांची चर्चा बाकी असल्याची माहिती आहे. येत्या 2 दिवसांत यावर देखील तोडगा निघणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसच्या वर्तुळातील जागावाटपाबाबत चर्चा
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. या 288 जागांपैकी काँग्रेसला 119 जागा मिळू शकतात अशी चर्चा आहे. यामध्ये 10 ते 15 जागा कमी जास्त होऊ शकतात. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला 86 जागा मिळू शकतील अशा देखील चर्चा आहेत. यामध्ये देखील 10 ते 15 जागा वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 75 जागा, शेकापला 3, समाजवादी पार्टीला 3 आणि सीपीएमला 2 जागा दिल्या जाण्याच्या चर्चा आहेत. याशिवाय मविआत 10 ते 15 जागावर चर्चा सुरु असल्याबाबतची माहिती काँग्रेसच्या वर्तुळातून मिळत आहे.
दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडची विधानसभा निवडणूक जाहीर करेल, त्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होईल.
इतर बातम्या :