मुंबई : नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता. राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता. या घालमेलीतून त्यांनी शिवसेना सोडली. मात्र त्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. एक राष्ट्रवादी आणि दुसरी काँग्रेसची. त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रंगत आणली. राणे यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
नारायण राणे यांना नेतृत्व करायला देऊ असं आश्वासन दिलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं आश्वासन दिलं हे लक्षात ठेवायचं असतं. काँग्रेसमध्ये असे निर्णय होत नाहीत. काँग्रेसमध्ये आल्यावर चार पाच महिन्यात काही घडेल, अशी अपेक्षा ठेऊ नका, असा सल्ला मी त्यांना तेव्हाच दिला होता. तुम्ही काँग्रेसमध्ये नवीन आहात. आमचं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. असंही मी त्यांना सांगितलं होतं, असं पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की, विरोधी पक्षात काम करण्याचा जो आनंद मिळतो, तो सत्तेत मिळत नाही. विरोधात असताना शेवटच्या माणसाला भेटता येतं. आपल्यावर कोणती जबाबदारी नसते. त्यामुळे बोलताही येतं. सत्तेत आल्यावर अनेक बंधनं येत असतात. फक्त विरोधात असताना कायम इथेच राहू, असा भ्रम मात्र करु नये. दिवस बदलत असतात, असंही पवार म्हणाले.
शिवसेना सोडल्यावर राणेंनी दोनपैकी एक 'चिठ्ठी' उचलून काँग्रेस प्रवेश : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2019 10:41 PM (IST)
काँग्रेसमध्ये आल्यावर चार पाच महिन्यात काही घडेल, अशी अपेक्षा ठेऊ नका, असा सल्ला मी त्यांना तेव्हाच दिला होता. तुम्ही काँग्रेसमध्ये नवीन आहात. आमचं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. असंही मी त्यांना सांगितलं होतं, असं पवार म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -