Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. तर आज अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत ही निवडणुक अधिक रंगतदार केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचेही दिसून आले आहे. अशातच मोहोळ (Mohol Assembly Constituency) येथील राखीव विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा दिलेली साक्षी कदम यांची उमेदवारी बदलून राजू खरे यांना देण्याची नामुष्की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (Sharad Pawar Group NCP) आली होती. मात्र उमेदवार बदलूनही पुन्हा एकदा शरद पवार गटात बंडखोरी झाल्याचे पुढे आले आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार बदलला, मात्र....
लोकसभेला भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय अण्णा क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडाचा झेंडा फडकवला आहे. लोकसभा निवडणूक काळात शरद पवार यांनी मोहोळमध्ये येऊन संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला होता. संजय क्षीरसागर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि मोहोळ मतदार संघातील एक ताकतवान नेता असल्याने पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेत विधानसभेत उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानुसार पहिल्या दिवसापासून संजय क्षीरसागर यांचे नाव पवार यांच्या गटात आघाडीवर असताना पहिल्यांदा साक्षी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर नाराजी वाढल्यावर राजू खरे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. कदम यांची उमेदवारी रद्द होताना संजय क्षीरसागर यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती.
तिकीट कापल्याने संजय क्षीरसागर बंडाच्या तयारीत
मात्र आज ऐनवेळी राजू खरे यांचे नाव जाहीर झाल्याने नाराज झालेल्या संजय शिरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. क्षीरसागर यांनी यापूर्वीही मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेली असून त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. यावेळी आपल्याला उमेदवारी नक्की मिळेल या आशेवर संपूर्ण मतदारसंघात गावोगावी त्यांनी प्रचार सुरू केला होता. प्रत्येक बूथनुसार कार्यकर्त्यांची नेमणुका करून निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी झाली असताना ऐनवेळी तिकीट कापले गेल्याने क्षीरसागर आता बंडाच्या तयारीत रिंगणात उतरले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या