मुंबई: अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. मात्र, नवाब मलिक (Nawab Malik) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म अद्याप प्राप्त न झाल्याने त्यांच्यासमोर पेच अजूनही कायम आहे. नवाब मलिक यांना विधानसभेची उमेदवारी देण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर केली नव्हती. आज नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले तरी पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता. पण मी तीन वाजेपर्यंत वाट पाहीन, अन्यथा मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करेन, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
मी आता निवडणूक लढायची नाही, असे ठरवले होते. पण शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातील लोकांच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातील गुंडशाही मोडून काढण्यासाठी मी इथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा एबी फॉर्म आला तर मी त्यांच्यावतीने लढेन, अन्यथा अपक्ष लढेन, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
भाजपच्या दबावामुळे तुम्हाला उमेदवारी नाकारली का? नवाब मलिक म्हणाले...
अजित पवार गटाने भाजपच्या दबावामुळे तुम्हाला उमेदवारी नाकारली का, असा प्रश्न नवाब मलिक यांना विचारण्यात आला. यावर नवाब मलिक यांनी म्हटले, भाजपचा दबाव आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण अजित पवार संकटकाळात माझ्यासोबत उभे राहिले. मी आता त्यांच्यासोबत उभे राहणे, माझे कर्तव्य आहे. मी पार्टीचा उमेदवारी अर्जही आता भरुन ठेवला आहे. वेळेत एबी फॉर्म आला तर ठीक आहे, नाहीतर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन. तीन वाजेपर्यंत मी वाट पाहीन, तोपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल. मला विश्वास आहे की, मी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
नवाब मलिकांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा
आज सकाळपासून नवाब मलिक यांना अजित पवार गटाने एबी फॉर्म देऊन ठेवल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवार गटाने त्यांना एबी फॉर्म उमेदवारी जोडायची की नाही, याबाबत सूचना न दिल्याने नवाब मलिक वेटिंगवर असल्याचे सांगितले जाते. परंतु, नवाब मलिक यांनी आपल्याला कोणताही एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा फेटाळून लावली.
आणखी वाचा