मुंबई: शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) यांनी सोमवारच्या दुपारी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सागर बंगल्यावर जात भेट घेतली. सुरेश म्हात्रे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील (Kapil Patil) यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते. मात्र, आता विधानसभेच्या निकालानंतर सुरेश म्हात्रे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. तर या भेटीमागील नेमकं कारण काय हे पुढे न आल्याने अनेक तर्क वितर्क देखील लावले जात होत. अशातच या भेटी मागील तपशील देत खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी या वर स्पष्टोक्ती दिली आहे.
शरद पवार यांना सोडण्याचा काही प्रश्नच नाही- सुरेश म्हात्रे
सोमवारच्या दुपारी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सागर बंगल्यावर मी माझ्या वैयक्तिक कामासाठी भेटलो. यात कुठलाही राजकीय विषय अथवा कारण नव्हतं. राजकीय विषय असेल तर दुपारी 2 वाजता गाडी घेऊन कोण जाईल का? मी इतर कोणाशीही भेटलो नाही. मात्र मिडियाने वेगवेगळे तर्क लावले आहेत. एकमेकांना भेटतो म्हणजे राजकारण असतं अस नाही. मी खासदार आहे, आमदार नाही. किंबहुना शरद पवार यांना सोडण्याचा काही प्रश्नच नाही. मी त्यांच्याच पक्षात आहे. अशी स्पष्टोक्ती देत खासदार सुरेश म्हात्रे यांनी सागर बंगल्यावरील भेटीचा सस्पेन्स संपवला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. यानंतर आता पुढील पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी हजर झाले होते. दरम्यान, सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीचा नेमका तपशील तेव्हा समोर आला नाही. बाळ्या मामा यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे तेव्हा सांगितले. मात्र, बाळ्या मामा आणि फडणवीसांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा