बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा काल (मंगळवारी) शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. दत्तात्रेय येळे यांनीच अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे. माळेगाव कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर काल (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 200 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत एकूण 593 उमेदवारी अर्ज
या निवडणूक प्रक्रियेत एकूण 593 उमेदवारी अर्ज बारामती निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले आहेत. विशेषतः या उमेदवारी यादीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ब' वर्ग संस्था मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केल्याचे स्पष्ट झाले. राजकीय स्थितीचा विचार करता विरोधी गटाचे प्रमुख व उमेदवार चंद्रराव तावरे हे 45 वर्षांपासून म्हणजेच सन 1980 पासून माळेगाव कारखान्याच्या राजकारणाशी संलग्न आहेत. तसेच रंजन तावरे हे देखील जवळपास तीस वर्षांपासून कारखान्याच्या राजकारणात सक्रिय राहिलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरलेला उमेदवारी अर्ज कायम राहतो की अजित पवार माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार उतरल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
29 मे ते 13 जून 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी
अर्ज स्वीकारण्याच्या आज शेवटच्या दिवशी माळेगाव (52), पणदरे ( 79), सांगवी (54), खांडज - शिरवली (66), निरावागज ( 59), बारामती (79), महिला राखीव (68), अनुसूचित जाती जमाती (20), भटक्या जमाती(64), इतर मागासवर्ग (25), ब वर्ग सहकारी उत्पादक,बिगर उत्पादक संस्था व पणन (28) अशा 593 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्जांची आज छानणी होणार असून 29 मे ते 13 जून 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांचा गुलाल
पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील 'श्री जय भवानी माता' पॅनलने दणदणीत विजय मिळवला. अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती झाल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाली. सभासदांनी पवार -जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवर विश्वास दाखवत श्री जय भवानीमाता पॅनेलकडे एकहाती सत्ता मिळाली.