कोल्हापूर :  राफेल व्यवहार प्रक्रिया मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हती म्हणूनच संरक्षण मंत्रीपद सोडून ते गोव्यात आले, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी कोल्हापुरात केला. राहुल गांधीनंतर आता प्रथमच शरद पवार मनोहर पर्रिकर यांच्याबाबत बोलले आहेत. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये
यावेळी पवार यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. नरेंद्र मोदींनी कोणतीच आश्वासने पाळली नाहीत. लोकांची नाराजी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. देशातील संस्थांवर हल्ला होत आहे. संस्था राजकीय कामासाठी वापरतात, असा आरोप त्यांनी केला.  शिवाय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रेस घेतात ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये. हे सर्वांनी पाळलं परंतु भाजप सरकार त्याला अपवाद आहे. ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बोलतात. पण सैन्याचा वापर कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी करु नये असे पवार यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंच्या सभांचे कौतुक

पवार यावेळी म्हणाले, राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. मोदी शहा घातक आहेत, हेच ते सर्वांना सांगत आहे. जे चुकीचं चाललंय ते राज ठाकरे प्रभावीपणे मांडत आहेत. हे मांडत असताना ते आपल्या भाषणात उदाहरणांसह दाखवत आहेत आणि ते अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांच्या सभांचा फायदा होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही पण राज्य चुकीच्या लोकांच्या हातातून काढून घेण्यासाठी सर्वांची मदत घेणार असल्याचे पवार म्हणाले.

मोदींनी निश्चित काय केलं हे त्यांना माहिती नाही. मोदींना गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यामुळं लोकं बदल करण्याचा मनस्थितीत आहेत. भाजपा आणि सेनेचं सरकार नको अशी लोकांची मनस्थिती आहे, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत जे सातत्य होतं ते आज राहीलं नसल्याचंही  शरद पवार यावेळी म्हणाले. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानात काँग्रेस-राष्ट्रवादी ला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.