नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीत त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या उमेदवाराचं आव्हान मिळणार आहे. मोदींविरोधात त्यांच्यासारखेच दिसणारे अभिनंदन पाठक निवडणूक लढणार आहेत.



अभिनंदन पाठक यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिलेलं नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लखनौमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून लवकरच ते वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

लखनौमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिनंदन पाठक म्हणाले की, "मी 26 तारखेला वाराणसीमधूनही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी डमी उमेदवार नाही. मी कोणाविरोधात नाही, तर 'जुमला'विरोधात आहेत. जिंकल्यानंतर राहुल गांधींना पाठिंबा देणार आहे."

विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही अभिनंदन पाठक यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता.

लखनौ मतदारसंघात भाजपने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर वाराणसीमध्ये स्वत: पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.