मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मुंबईमध्ये पेडर रोड परिसरात आज मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी काल पंतप्रधानपदाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी भाष्य केले. मला मिस कोट केलं असल्याचं शरद पवार म्हणाले.  त्या मुलाखतीत मला विचारलं होतं की, राहुल गांधींशिवाय इतर कोण पर्याय आहेत, तर त्यावर मी मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू अशी नावं सांगितली.

हे ज्यांनी चुकीचं छापलं त्यांचा बालिशपणा आहे. हे केवळ टीआरपीसाठी असं छापलं असल्याचं देखील पवार म्हणाले. सोबतच देशात स्थिर सरकार येणं आवश्यक आहे. आजचा दिवस देशासाठी महत्वाचा आहे.

मुंबईतील मतदान टक्केवारी बाबत काळजी वाटते. मात्र मुंबईकर महत्वाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान हक्क बजावतील. मुंबई मागे राहणार नाही, असेही पवार म्हणाले. मला सगळ्या निवडणुका  महत्वाच्या आहेत. मावळ काय, बारामती काय, मुंबई काय सगळ्याच निवडणुका महत्वाच्या आहेत. यावेळी लोक निर्णायक निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.




शरद पवार यांनी पुन्हा एकदा काल पंतप्रधानपदाविषयीचा अंदाज वर्तवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा गरम झाली होती.  एनडीएला बहुमत मिळालं नाही तर ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं होतं.

आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं देखील पवारांनी आवर्जून म्हटलं होतं. राष्ट्रवादी फक्त 22 जागा लढत आहे, या सर्व जागा आम्ही जरी जिंकल्या तरी बहुमताचा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले होते.

एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात, कारण त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे, असेही पवार म्हणाले होते.