Shahapur Vidhan Sabha 2024 : शहापूर विधानसभा मतदारसंघात यंदा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा यांना तिकीट देण्यात आलं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाने पांडुरंग बरोरा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या मतदारसंघात दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. 


शहापूर विधानसभा मतदारसंघ



शहापूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेच्या ठाणे जिल्ह्यातील  18 मतदारसंघांपैकी एक आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघ इतर पाच विधानसभा मतदारसंघांसह भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा (ST) भाग आहे.

शहापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती



  • पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)

  • दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस)


शहापूर विधानसभा निवडणूक निकाल 2019



  • दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी,  76,053 मते 

  • पांडुरंग बरोरा (शिवसेना) - 60,949 मते


शहापूर विधानसभा निवडणूक निकाल 2014



  • पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी,56,813 मते

  • दौलत दरोडा (शिवसेना) -  51,269 मते 


 


मतदारसंघाचा इतिहास


सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुका आहे. मुंबईसह - ठाणे जिल्ह्याचा तहान भागवणारा धरणांचा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडे नाशिक जिल्हा, तर दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. शहापूरमध्ये आदिवासींची संख्या जास्त असल्याने हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी आणि आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. 


मतदारसंघातील सद्यस्थिती


शहापूर विधानसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाबरोबर प्रामुख्याने आदिवासी, कातकरी महादेव कोळी, वारली आणि ठाकूर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे या मतदारसंघात आदिवासी समाजाची मतं निर्णायक ठरतात. शहापूर विधानसभा मतदारसंघात पांडूरंग बरोरा यांचे वडील दिवंगत महादू बरोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले जाते. त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले, पुढे त्यांच्या निधनाने त्यांचे पुत्र पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघात आमदार झाले. पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीतील बंडानंतरही शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ambernath Vidhan Sabha : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेचे बालाजी किणीकर सलग चौथ्यांदा विजयी होणार की राजेंद्र वानखेडे बाजी पलटणार?