मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे कल एनडीएच्या बाजूने झुकत असताना दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये देखील मोठा उलटफेर होत असताना दिसत आहेत. प्राथमिक कलानुसार भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या एनडीएला मोठी आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे सेन्सेक्स 40 हजार पार गेला आहे.


सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे सेंसेक्स 40 हजाराच्या वर गेला आहे. पुन्हा एकदा बहुमताचे सरकार येणार असे दिसत असल्याने शेअर बाजार तर तेजीत दिसत असून पहिल्यांदाच सेन्सेक्सने 40 हजारांपार मजल मारली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचला आहे.

20 मे रोजी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेंसेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सेंसेक्सने 39 हजार 554.28 चा पल्ला गाठला होता. या उच्चांकाचा विक्रम मोडीत काढत आज सकाळी सेन्सेक्सने नवा उच्चांक स्थापित केला. आजच्या दिवसभरात सेन्सेक्सने 40 हजार 124.96 चा आकडा गाठला. तसेच निफ्टीही 12 हजार अंकाच्या पुढे गेला.

एक्झिट पोलनंतर शेअर बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. पोलनंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला होता. रिअल इस्टेट क्षेत्रातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जर एक्झिट पोलप्रमाणे लागले तर शेअर बाजार यापेक्षाही जास्त तेजी येईल असा तज्ञांचा अंदाज होता. मात्र एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि बहुमताच्या आकड्यासाठी मोठीच कसरत करावी लागली तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात पुन्हा एकदा एनडीएचीच येण्याची चिन्हे दिसत असताना शेअर बाजारात उत्साह आहे.