सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचं अखेर ठरलं असून 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. नवी दिल्लीमध्ये उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा होणार आहे. दरम्यान, यानंतर उदयनराजे 15 तारखेला साताऱ्यात येणाऱ्या भाजपच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.

शरद पवारांचा आशिर्वाद घेऊनच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले भाजपमध्ये येतील. परवा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला होता, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते यावेत असं मला वाटतं. त्यांनी यावं अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश प्रत्येक मेगाभरतीमध्ये पुढे ढकलला जात होता.  उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 सप्टेंबर रोजी 'वर्षा' बंगल्यावर दीड तास चर्चा झाली होती. सगळ्या घडामोडींनंतर अखेर खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न

खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु उदयनराजेंनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. त्यानंतर पुण्यात उदयनराजेंची जवळच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली होती. यात देखील कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये न झाल्याचा सल्ला दिला होता. तर दुसरीकडे उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा न दिल्याने त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपमधले काही नेते अनुत्सुक असल्याची चर्चा होती.



विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाला लागलेली गळती कमी झालेली नाही.  राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी काल भाजप प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपच्या मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या