साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पदाचा राजीनामा देत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपअध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर भाजप वाटचाल करत असल्याचं सांगत उदयनराजे भाजपवासी झाले. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. उदयनराजेंनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
येत्या 17 सप्टेंबरला महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यात उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होईल. त्यामुळे येत्या 17 तारखेपासून राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते.
विधानसभेसोबत उदयनराजे यांच्या राजीनाम्याने रिक्त साताऱ्याच्या जागेवर खासदारकीसाठीही निवडणूक होऊ शकते. त्यामुळे येत्या 17 सप्टेंबरला निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप प्रवेशानंतर पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेने मी हे पाऊल उचलले आहे. मोदी-शाह देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत, त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.