माढा : मोहिते पाटील ही राजकारणात मोडीत निघालेली भांडी असून पवार साहेबांनी 10 वर्षे ती कल्हई करून चालवली. पण ती देखील चालेनात हे पवारांच्या लक्षात आल्यावर आता ही भांडी भाजपने चालवायला घेतली आहेत, अशा शब्दात माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदे यांनी मोहिते पाटलांवर  घणाघात केला आहे.


गेली 10 वर्षे याच मोहिते पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीत विरोध करीत भाजपच्या जवळ गेलो होतो, मात्र पुन्हा भाजपने यांनाच पक्षात प्रवेश दिल्याने आपण पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले. आपण कधीही भाजपात प्रवेश केलेला नव्हता मात्र भाजपात  राष्ट्रवादीपेक्षा जास्त गटबाजी अनुभवायला मिळाल्यावर भाजपापासूनही दूर थांबत जिल्हापरिषदेचे काम करीत राहिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी मुकाबला होणार


राज्यातील मोठी घराणी वाचवण्याचे काम भाजप करू लागल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ही घराणी म्हणजे पोकळ वासा आहे याची जाणीव होईल असेही ते सांगितले. मोहिते पाटील यांच्या अनेक संस्थांमध्ये जनतेचे पैसे अडकले असून त्यांनी ते पैसे जर लगेच दिले तर आपण लोकसभेच्या प्रचाराला सुद्धा बाहेर पडणार नाही असे आव्हान देखील शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

मोहिते विरुद्ध शिंदे ही लढत साऱ्या महाराष्ट्राला पाहायची असून मी तर माझी उमेदवारी जाहीर केली, आता मुख्यमंत्र्यांना जाहीर केल्याप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपाची उमेदवारी द्यावी असे आव्हान शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

दरम्यान, बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज एबीपी माझाशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत. ते उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना भाजपकडून माढ्याची उमेदवार देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यामुळे बराच काळ चर्चेत असलेल्या माढा लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. माढामधून आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपकडून नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे.

VIDEO | माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी मुकाबला होणार | एबीपी माझा