मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता भाजप महाविकासआघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेतील दारुण पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवले जाणार? का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. याबाबात आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं कळतं भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष अशी कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे ते करू शकतात. याआधी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक का त्यांच्यासोबत गेले? ते देखील भीतीपोटीच भाजपसोबत गेले, ते काय ऑपरेशन लोटस होतं का नाही. ते तर ऑपरेशन डर होतं. पळून घाबरून गेले ते. भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे. तुमची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही असं संजय राऊत यांनी लगावला आहे.
सत्ताधारी सभागृह चालू देत नाही
सत्ताधारी सभागृह चालू देत नाहीत. हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदाणी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्यानुसार आम्ही अडाणी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, असंही अविश्वास ठरवाबाबत संजय राऊत म्हणालेत.
पडळकरांच्या शरद पवारांवरील टीकेवर उत्तर
काल (मंगळवारी) माळशिरसमध्ये सभेवेळी बोलताना भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली. शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अशी विधान शोभतात का? भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की, त्यांना ही भाषा वापरायला त्यांनी सांगितली आहे का? कोकणातील टिल्लू गब्बर सिंग अशी भाषा वापरतात. हे राज्याला शोभणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.