मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) एकहाती सत्ता मिळाली. तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) सुफडासाफ झाला. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने निकाल लागले, ते संशयास्पद आहेत. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान करून घेतलं. तरीही या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर ते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. देशाच्या सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेसंदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता.तुम्ही कशा करता बसलेला आहात? अडीच-तीन वर्ष तुम्ही निर्णय देत नसेल तर तुम्ही जनतेच्या पैशाचा चुराडा करत आहात. सरन्यायाधीश म्हणून ते घटनात्मक निर्णय घेऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचे चित्र बदललं असतं. आज जे तुम्हाला चित्र दिसत आहे ते चित्र नक्कीच दिसलं नसतं. पक्षांतराच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले आहेत. आत्ताही कोणी कुठेही, कशाही उड्या मारू शकतात, विकत घेऊ शकतात, कारण कायद्याची भीतीच राहिलेले नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरातची लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा गुजरातमध्ये त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातला मोदींच्या नावाने स्टेडियम आहे. तिथे जास्त लोक बसतात. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी सोहळा घ्यावा हे संयुक्तिक ठरेल. शिवतीर्थावर शपथविधी घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. वानखेडे स्टेडियमवर घेतला तर 106 हुतात्म्यांचा अपमान होईल. त्यामुळे त्यांनी शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
ही लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही
सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे आम्ही जनतेच्या न्यायालयात जात आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जनतेच्या न्यायालयात सुद्धा न्याय विकत घेण्यात आला. पण आम्ही निराश नाही. आम्हाला वाईट जरूर वाटलं. शेवटी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राचे काय होणार? महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता आम्हाला आहे. ही लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. मतविगणी हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. ज्या पद्धतीने या लोकांनी प्रत्येक मतदारसंघात मत विभागासाठी अडथळे निर्माण केले. स्वतःपेक्षा मत विभागणी कशी होईल? याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले आणि त्याचा फटका आम्हाला बसला. मनसे वंचित या सगळ्यांना व्यवस्थित मॅनेजमेंट करून ठिकठिकाणी आमचे उमेदवार कमी मतांनी पाडण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी असा काय तीर मारला की त्यांना इतका जागा मिळाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहिली. त्यांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीने विषारी प्रचार केला. ते लोकांची मन आणि मत भडकवत राहिले. त्याचा आम्हाला काही ठिकाणी परिणाम झाल्याचे दिसत आहे. शरद पवारांसारखा महाराष्ट्रातील सर्वात मोठा नेता त्यांनी या राज्यात उघडपणे भूमिका घेतली, त्यांना ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाला. शरद पवार यांना मानणारा वर्ग ज्या भागात आहे त्या भागात शरद पवार साहेबांचे उमेदवार पडले असतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यात आम्हाला ज्या पद्धतीने हार पत्करावी लागली तो सुद्धा गंभीर विषय आहे.
लवकरच एकनाथ शिंदे यांच्याबाबत...
एकनाथ शिंदे हे खूप मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाही. त्यांनी शिवसेनेशी बेइमानी करून भारतीय जनता पक्ष, मोदी, शाह यांच्या मदतीने आपले राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय जनता पक्ष हा वापरा आणि फेकून द्या या वृत्तीचा असल्याने जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडले ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडेल का? याच्याविषयी माझ्या मनामध्ये नेहमीच शंका येते, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा