राष्ट्रवादीचा काटशह, अहमदनगरमधून सुजय विखेंविरोधात संग्राम जगतापांना तिकीट
एबीपी माझा वेब टीम | 20 Mar 2019 06:45 PM (IST)
सुजय विखे भाजपच्या तिकीटावर नगरमधून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे.
मुंबई : ज्या अहमदनगरच्या जागेवरुन आघाडीमध्ये बिघाडी झाली होती, त्या जागेवर अखेर राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना दक्षिण अहमदनगर या लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. सुजय विखे भाजपच्या तिकीटावर नगरमधून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. पर्यायाने अहमदनगरची लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.