नाशिक-पुणे महामार्गावर असणारा, अहमदनगर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचा असलेला हा संगमनेर विधानसभा मतदार संघ. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला.. ही काही एवढीच ओळख नाहीय.. तर अहमदनगर जिल्ह्यातील सत्तासंर्घषाचं किंवा संत्तासंतुलनाचा  एक महत्वाचा पदर म्हणजे संगमनेर असतो.

अहमदनगर जिल्ह्यातील सत्तासंलुतन राखण्यासाठीच म्हणून काय, राधाकृष्ण विखेपाटील भाजपवासी झाल्यावर लगेचच संगमनेरच्या बाळासाहेब थोरातांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी झाली.

अगदी किरकोळ फरकाने पुरुष मतदारांएवढ्याच महिला मतदार असलेला हा संगमनेर विधानसभा मतदार संघ. अनेक वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांचा या मतदारसंघावर वरचष्मा राहिलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघातून सलग सहावेळा आमदार  निवडून येण्याचा करिष्मा केलाय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या संगमनेर विधानसभा मतदार संघात लोकसभेला युतीच्या पारड्यात मत टाकली जातात, मात्र विधानसभेत बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्याची किमया त्यांच्या विरोधकांना साधता आलेली नाही

संगमनेर तालुक्यातील  पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायती तसंच स्थानिक संस्थावर थोरातांचं वर्चस्व आहे. १९८२ पासून पुढे सलग सहावेळा निवडून आले कारण विरोधकांना त्यांच्या विरोधात एकजूट करता येत नाही.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी  एक लाख तीन हजार ५६४ एवढी मते घेऊन शिवसेनेचे उमेदवार जनार्दन आहेर यांचा तब्बल 60 हजारांच्या फरकाने पराभव केला. मागील निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली आणि त्यातही मोदी लाट असतानाही बाळासाहेब थोरात यांचं वाढतं मताधिक्य विरोधकांना रोखता आलं नाही.

काँग्रेस संघटनेत युवक काँग्रेसचं स्थानही महत्वाचं आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सत्यजीत तांबे हे ही संगमनेरचेच. एवढंच नाही तर सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरातांचे भाचे. सध्या काँग्रेसची राज्यातली मोठी पदे या मामा-भाच्यांकडे आहेत!

संगमनेर शहराला निळवंडे धरणातून केलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईप लाईन, शहरातील सर्वच सहकारी संस्थांचा आदर्श आणि स्वच्छ कारभार, कार्यकर्त्यांची मजबूत फळी या बाळासाहेब थोरात यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तरीही निळवंडे धरणाच्या कालव्यांची रखडलेली कामे ही एक कमकुवत बाजू समजली जात आहे.

अमृतवाहिनी कारखाना आणि शिक्षण समूह हे या मतदारसंघातील बाळासाहेब थोरात याचं एक बलस्थान आहे. अमृतवाहिनी हॉस्पिटल, मेडिकल-फार्मसी कॉलेज, इंजिनीयरिंग कॉलेज असा मोठा लवाजामा आहे. या माध्यमातून त्यांच्या अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालवले जातात. मतदारांना बांधून ठेवण्यात अमृतवाहिनी उपक्रमाचा वाटाही मोठा असतो.



२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी

बाळासाहेब थोरात (काँग्रेस)  १०३५६४
जनार्दन आहेर (शिवसेना)    ४४७५९
राजेश चौधरी (भाजप)         २५००७

काय होईल या निवडणुकीत 

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संगमनेर  शहरात सभा घेतली तरीही संगमनेर विधानसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला आठ हजारांचं मताधिक्य मिळालं.  २०१९ च्या आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र बाळासाहेब थोरात यांना संघर्ष करावा लागणार आहे, तो आधी त्यांच्याच पक्षात असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा, कारण काही दिवसांपूर्वी  राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले आहेत.




बाळासाहेब  थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील एकाच पक्षात असताना देखील त्यांच्यात अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु होतं.. आता मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र आपल्या मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याला उमेदवारी दिल्यानंतरही काँग्रेसमध्येच असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार केला. आता थेट भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात काय करतील याची थोरातांच्या कार्यकर्त्यांसह अनेकांना उत्सुकता आहे.  थोरातांना शह देण्यासाठी ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. विखे पाटील ज्या उमेदवाराला उभं करतील, त्याच्या मागे पक्षासह विखेंची ताकद उभी राहणार असल्याने यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यापुढे आव्हान तर असणार आहे, फक्त प्रश्न आहे, तो म्हणजे बाळासाहेब थोरात हे आव्हान पेलणार कसं हा..

अनेक इच्छुकांची भाऊगर्दी

युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेचा आहे. मागील वेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली असल्यानं यावेळीही भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून अनेक जण इच्छुक आहेत. कोणातही मोठा विरोधक तालुक्यात नसला तरी  जनार्दन आहेर, नाना थोरात, राजेश चौधरी यांच्यासह तब्बल ४० जण इच्छूक असल्याची माहिती समोर आलीय.. राधाकृष्ण विखे पाटील भाजपात आल्याने हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र विखे पाटील कोणाच्या झोळीत माप टाकणार हे पाहणं सध्या तरी महत्वाचं ठरणार आहे. एवढंच नाही तर संगमनेर मतदारसंघाच्या शेजारी असलेऱ्या अकोले मतदार संघातील पिचड पिता पुत्रांच्या भाजप प्रवेशाचा परिणामही संगमनेरमध्ये दिसू शकतो राजकीय जाणकारांना वाटतं.